पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर रात्री १० नंतर बाहेरचे विक्रेते येतात कुठून? परवानगी कोणी दिली? सिद्धार्थ शिरोळेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 11:17 IST2025-07-23T11:17:17+5:302025-07-23T11:17:52+5:30
विक्रेत्यांकडे असा कोणता कोणता माल असतो, ते बांगलादेशी घुसखोर किंवा आणखी कोणी आहेत का याची तपासणी करण्याची गरज आहे

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर रात्री १० नंतर बाहेरचे विक्रेते येतात कुठून? परवानगी कोणी दिली? सिद्धार्थ शिरोळेंचा सवाल
पुणे : फर्ग्युसन रस्त्यावर रात्री १० नंतर बाहेरचे विक्रेते त्यांचा माल घेऊन विक्रीसाठी येतात. त्यांची चौकशी करावी, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केली असल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मंगळवारी पत्रकारांबरोबर बोलताना दिली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी फर्ग्युसन रस्त्यावर लह जिहाद सुरू आहे, असा आरोप केला होता, त्यावर काहीही बोलणे आमदार शिरोळे यांनी टाळले.
पडळकर यांनी जाहीरपणे हे वक्तव्य केले होते. स्थानिक विक्रेत्यांनीही पत्रकार परिषद घेत पडळकर यांच्या या आरोपावर टीका करत त्यांचा निषेध केला होता. आमदार शिरोळे यांच्या विधानसभा मतदारसंघात हा परिसर येतो. याविषयी विचारले असता त्यांनी काहीही बोलणे टाळले. मात्र, या रस्त्यावर रात्री १० वाजल्यानंतर लहानलहान खोक्यांमध्ये कसलाकसला माल घेऊन अनेक विक्रेते येतात. ते कुठले आहेत? कुठून येतात? त्यांना परवानगी कोणी दिली? परवानगी नसेल तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असे प्रश्न आपण पोलिस आयुक्तांची भेट घेऊन विचारले व कारवाईची मागणी केली, असे शिरोळे यांनी सांगितले.
फक्त ५० रुपयांमध्ये हे विक्रेते टी शर्ट विकतात. त्यांच्याकडे असाच कोणता कोणता माल असतो, ते बांगलादेशी घुसखोर किंवा आणखी कोणी आहेत का याची तपासणी करण्याची गरज आमदार शिरोळे यांनी व्यक्त केली. स्थानिक विक्रेते रात्री १० पर्यंत थांबतच नाहीत. ते गेले की हे बाहेरचे लोक येतात. स्थानिक दुकानदारांच्याही त्यांच्याबद्दल तक्रारी आहेत. याचा आपण पाठपुरावा करणार आहे. विधानसभा आवारात व प्रत्यक्ष विधानसभेत अधिवेशनादरम्यान जे काही झाले, त्याविषयी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर यावर काही बोलणे योग्य नाही, असे शिरोळे म्हणाले.
महापालिकेने सह्याद्री रुग्णालयाला नाममात्र किमतीमध्ये जागा दिली. त्यांनी ती दुसऱ्या व्यवस्थापनाला दिली. यात मोठा व्यवहार झाला. आता ज्यांनी जागा घेतली ते रुग्णांना भरमसाट दर लावत आहेत. याविषयी विचारले असता शिरोळे यांनी, आपल्याकडे जादा शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, मात्र जागा व त्यासंबंधीचे व्यवहार याची माहिती नाही, ती घेऊ, असे सांगितले.