पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातील साहित्य गेले कुठे? एसी, टीव्ही, झुंबर, ॲक्वागार्ड, वॉकीटॉकीसह अन्य वस्तू झाल्या गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 11:47 IST2025-08-06T11:46:57+5:302025-08-06T11:47:40+5:30
बंगल्यात २४ तास सुरक्षा आणि सीसीटीव्ही असताना लाखो रुपयांचे साहित्य गेले कुठे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे

पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातील साहित्य गेले कुठे? एसी, टीव्ही, झुंबर, ॲक्वागार्ड, वॉकीटॉकीसह अन्य वस्तू झाल्या गायब
पुणे: पुणे महापालिका आयुक्तांच्या मॉडेल कॉलनी येथील सुसज्ज बंगल्यातून एसी, टीव्ही, झुंबर, ॲक्वागार्ड, वॉकीटॉकीसह अन्य वस्तू गायब झाल्या आहेत. त्यामुळे या बंगल्यात २४ तास सुरक्षा आणि सीसीटीव्ही असताना लाखो रुपयांचे साहित्य गेले कुठे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
पुणे महापालिका आयुक्तांचा बंगला पुन्हा सुसज्ज करण्याचे काम सुरू झाले. त्यानंतरच वस्तू गायब असल्याचे निदर्शनास आले. गायब वस्तूंमध्ये चार एसी, पितळी दिवे, झुंबर, दोन एलईडी टीव्ही, कॉफी मशीन, ॲक्वागार्ड आणि अन्य महागडे साहित्य आहे. पालिका प्रशासनाने आता नव्या वस्तू खरेदीसाठी सुमारे २० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून, काही वस्तूंची खरेदी, तर काहींसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र, इतक्या महत्त्वाच्या बंगल्यातून साहित्य गेल्या कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या बंगल्याची जबाबदारी भवन की सुरक्षा विभागाची आहे, यावरून प्रशासनात गोंधळाचे वातावरण आहे.
महापौर बंगल्यातून टीव्ही गेला होता चोरीला
पुणे महापालिकेच्या महापौर बंगल्यातून यापूर्वी टीव्ही चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. मात्र त्या प्रकरणातील चोर आतापर्यंत सापडलेला नाही.