काही वर्षांपूर्वी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका तसेच आजुबाजुच्या शहरांत बस सेवा पुरविणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बस आल्या आहेत. प्रदुषण तर कमी झालेच परंतू यामुळे जास्त प्रवासी आणि फुल एसीतून प्रवास करणे पुणेकरांना शक्य झाले आहे. शिवाय अवघ्या १०-१५ रुपयांत एसी बसचा प्रवास करणे देखील सोईचे झाले आहे.
काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदी ८-१० वर्षांपर्यंत पुण्यात जुन्याच पिवळ्या, तांबड्या रंगाच्या बस फिरत होत्या. त्यांचा आकारही खूप कमी होता. यामुळे प्रवासी खच्चून भरले तरी जेमतेमच असायचे. पुढे थोड्या मोठ्या बस ताफ्यात आल्या, पुण्याची प्रवासी संख्याही वाढत गेली. यामुळे सोय होऊ लागली होती. अशातच आता ईलेक्ट्रीक युग आले. ग्लोबल वॉर्मिंगच्या दट्ट्यापाई सुरुवातीला केंद्र सरकारच्या मदतीने नंतर महापालिकांनी इलेक्ट्रीक बस रस्त्यावर दिसू लागल्या.
आजही महागाईच्या दिवसात पुणे ते पिंपरी, चिंचवडचा प्रवास १०-१५,२० रुपयांत होत आहे. ते देखील एसीमध्ये बसून. मेट्रोचे तिकीट दोन-चार रुपयांनी जास्त आहे, परंतू या बस माफक दरात सामान्यांचा आधार बनल्या आहेत. या बसही आता लाख-दीड लाख किमी फिरल्या आहेत. शहरात एवढे रनिंग आणि ते देखील गाडी चार्ज करून करायचे म्हटले तर जरा नवलच वाटते, परंतू महामंडळाच्या ताफ्यात अशा अनेक बस आहेत, ज्यांनी लाखाचा टप्पा पार केला आहे.
या ईलेक्ट्रीक बसची रेंज ही साधारण २५० किमी आहे. याची बॅटरी मोठी असली तरी फास्ट चार्जरवर ही गाड़ी तासाभरात पूर्ण चार्ज होते. ट्रॅफिक, स्पीडब्रेकर सारखे सारखे सिग्नल, बस स्टॉपवर थांबायचे असल्याने ४०-४० किमीच्या चार पाच फेऱ्यातरी आरामात होतात. शिवाय या बस लांबलचक असल्याने जास्त प्रवासी नेता येतात. यानंतर पुन्हा चार्जिंग करून ती बस रस्त्यावर उतरविली जाते. एका बसच्या अशा जवळपास १० ते १२ फेऱ्या होतात.
म्हणूनच नादुरुस्त पडतात की काय...म्हणजेच या बसना अक्षरश: पिळून घेतले जाते. यामुळे की काय या बसचा कायमस्वरुपी बाद होण्याचा आकडा खूप मोठा आहे. ब्रेकडाऊन होण्याची देखील संख्या खूप मोठी आहे. परंतू एकंदरीत तिकीटाचे दर आणि एसीची सोय पाहता पुणेकरांना पुन्हा जुन्या सीएनजी बसेसकडे जाणे सोईचे ठरणार नाही. कारण जरी तिकीट दर तेवढाच असला तरी एसी काही मिळण्याची शक्यता नाही.