कमळ काढायला गेले अन् जीव गमावून बसले; वारजेत खाणीच्या पाण्यात बुडून रिक्षाचालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:24 IST2025-08-05T11:23:40+5:302025-08-05T11:24:04+5:30
रिक्षाचालक यांनी काही आठवड्यापूर्वी पांढरे व निळे कमळ व कमळाची रोपे आणली होती, आता लाल कमळ त्यांना हवे होते

कमळ काढायला गेले अन् जीव गमावून बसले; वारजेत खाणीच्या पाण्यात बुडून रिक्षाचालकाचा मृत्यू
वारजे : खाणीच्या खड्ड्याच्या पाण्यात उतरून कमळाचे फूल तोडणे एका रिक्षा चालकाला वारजे परिसरात जिवावर बेतले असून त्याचा त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. विजय रघुनाथ चव्हाण (वय ५१ रा. इंद्रा कॉलनी, उत्तमनगर) असे दुर्दैवी रिक्षा चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण हे रिक्षा व्यवसाय करण्यासाठी घराबाहेर पडले होते. ते संध्याकाळी घरी न आल्याने दुसऱ्या दिवशीपर्यंत त्यांचे बंधू संजय चव्हाण आणि कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शोध घेतला परंतु ते सापडले नाहीत त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दिली. काही दिवसांपासूर्वी विजय यांनी कोथरूडमधील गोपीनाथ नगर परिसरातून कमळ व कमळाची रोपे व वेल आणली होती. आपण परत आणू असेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार मागच्या बुधवारी कुटुंबीयांनी गोपीनाथ नगर परिसरात शोध केला असता तेथे त्यांची रिक्षा सापडली. गुरुवारी पुन्हा त्याच परिसरात पोलिसांनीही शोध घेतला त्यावेळी खाणीच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांनी बाहेर काढल्यावर तो मृतदेह विजय चव्हाण यांचा असल्याची ओळख पटली. त्यांच्या पायात व हातात कमळाची वेल गुरफटलेली आढळली. त्यावरून कमळ काढताना त्यांचा पाय अडकून हा अपघात झाला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
कपडे, चपला सापडल्या मोबाइल अद्याप गायब
विजय यांना निसर्गाची आवड होती. काही आठवड्यापूर्वी त्यांनी पांढरे व निळे कमळ व कमळाची रोपे आणली होती, आता लाल कमळ त्यांना हवे होते. ड्रममध्ये त्याचे रोपण करणार असल्याचेही त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते. त्यामुळे पावसाने साठलेल्या खोल खाणीच्या पाण्यात बहुधा तळाशी जाऊन कमळ तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला व त्यातच त्यांचा अंत झाला असावा. दरम्यान, घटनास्थळी त्यांचे कपडे चपला व इतर वस्तू सापडले असून मोबाइल मात्र सापडलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गूढदेखील वाढलेले आहे.