Weather Update : ढगाळ वातावरणामुळे शहरातील थंडी गायब..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 10:52 IST2024-12-06T10:50:25+5:302024-12-06T10:52:09+5:30
Weather Update : कमाल, किमान तापमानात वाढ, पुढील आठवड्यात पुन्हा गारठा वाढणार

Weather Update : ढगाळ वातावरणामुळे शहरातील थंडी गायब..!
पिंपरी : शहरात बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तापमान सरासरी पुढे जाऊन थंडी गायब झाली आहे. त्यामुळे किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. मात्र, पुढील आठवड्यापासून पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी (दि. ५) किमान २३, तर कमाल ३३.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी उकाडा जाणवत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा शहरात उशिराने थंडी सुरू झाली आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात गारठा जाणवायला लागला होता.
नोव्हेंबरच्या सुरुवातीला तापमानात गारवा होता. मात्र, कडाक्याची थंडी नव्हती. त्यामुळे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत जास्त होते. मात्र, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात थंडीचा कडाका वाढला. बहुतांश भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर घटले होते. अनेक भागांत पारा १२ अंशाखाली गेला होता.
बंगालच्या उपसागरात आणि पाठोपाठ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण होत आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. रात्री उकाडा जाणवत आहे. गुरुवारी (दि. ५) चंद्रपूर येथे राज्यातील नीचांकी १७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तर सोलापूर येथे उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.