राज यांनी महायुतीत यावे असे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत, शेवटी निर्णय त्यांच्याच हातात - उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 22:34 IST2025-09-10T20:58:59+5:302025-09-10T22:34:31+5:30
स्वतंत्र लढो वा युती करून, तालुका पंचायत समितीपासून मुंबई महापालिकेपर्यंत आम्हीच जिंकणार आहोत

राज यांनी महायुतीत यावे असे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत, शेवटी निर्णय त्यांच्याच हातात - उदय सामंत
पुणे : स्वतंत्र लढायचे की युती करून हे आम्ही एकत्र बसल्यावरच ठरेल, मात्र काहीही झाले तरी तालुका पंचायत समितीपासून मुंबई महापालिकेपर्यंत आम्हीच जिंकणार आहोत, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. राज ठाकरे यांना कोणी ४ वेळा भेटले असेल तर मीही ५ वेळा भेटलोय, अशी खिल्ली उडवत त्यांनी कोणाची भेट घ्यायची हे त्यांनीच ठरवायचे आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची संघटनात्मक बैठक घेण्यासाठी सामंत पुण्यात आले होते. सारसबागेसमोरील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीसाठी पक्षाने जबाबदारी दिलेले महानगर प्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर, शहरप्रमुख नाना भानगिरे तसेच किरण साळी व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, ‘निवडणूक महायुती करून लढवली जाईल, मात्र याबाबत आमची समन्वय समिती आहे. या समितीची बैठक होईल. त्याची माहिती नेत्यांना दिली जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय होईल. महायुतीमधील कोणताही पक्ष आम्ही स्वतंत्र लढणार आहोत असे म्हणत असेल तर त्यांना व आम्हालाही तसा अधिकार आहे. प्रत्येकाला स्वत:चा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र त्यासाठी संघटना मजबूत लागते. तेच सांगण्यासाठी व संघटनात्मक रचनेवर भर देण्यासाठी मी इथे आलो. त्यामुळे संघटना गतिमान होईल. निवडणुकीत त्याचा निश्चितपणे उपयोग होईल.’ युती झालीच तर जागा वाटपात तुम्ही किती जागा मागणार? या प्रश्नावर सामंत म्हणाले,‘आता प्रत्येक पक्ष सांगतोय तेवढ्या जागांची बेरीज केली तर ती अडीचशे जागांच्या पुढे जाईल. जागा तर १६५ आहेत. किती जागा लढवायच्या हे आम्ही ठरवले आहे. मात्र ते गुलदस्त्यात आहे. युती झाल्यावर आम्ही ती संख्या जाहीर करू.
राज ठाकरे यांनी चौथ्यांदा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. याकडे लक्ष वेधले असता सामंत म्हणाले, मीही राज यांना ५ वेळा भेटलो आहे. राज यांनी महायुतीत यावे असे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत. ते आले तर चांगलेच आहे, मात्र त्यांनी वेगळा निर्णय घेतला तर तो त्यांचा अधिकार आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना कोणीही गंभीरपणे घेत नाही, असा टोला सामंत यांनी लगावला.