आम्ही शिवछत्रपतींचे मावळेच - देवेंद्र फडणवीस; जागतिक वारशासाठी १२ किल्ल्यांचे युनेस्कोला सादरीकरण
By राजू इनामदार | Updated: February 19, 2025 16:49 IST2025-02-19T16:48:04+5:302025-02-19T16:49:21+5:30
महाराजा प्रतिष्ठान संचलित आंबेगाव पठार येथील शिवसृष्टीस ५० कोटी रूपयांचा निधी जाहीर

आम्ही शिवछत्रपतींचे मावळेच - देवेंद्र फडणवीस; जागतिक वारशासाठी १२ किल्ल्यांचे युनेस्कोला सादरीकरण
पुणे: मी स्वतः व माझे दोन्ही उपमुख्यमंत्री शिवछत्रपतींचे मावळेच आहोत, काहीही मदत लागली तर आम्ही आहोतच असे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महाराजा प्रतिष्ठान संचलित आंबेगाव पठार येथील शिवसृष्टीस ५० कोटी रूपयांचा निधी जाहीर केला. राज्यातील १२ किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळात समावेश व्हावा यासाठी लवकरच युनोस्को मध्ये सादरीकरण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आयोजित शिवसृष्टीच्या दुसर्या टप्प्याचे लोकार्पण शिवजयंतीचे औचित्य साधून फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी दुपारी आंबेगाव पठारमध्ये झाले. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार विजय शिवतारे खासदार उदयनराजे भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघचालक नानासाहेब जाधव, पुणे क्षेत्रीय संघचालक रविंद्र वंजारवाडकर, प्रतिष्ठानचे विश्वस्त विनय सहस्त्रबुद्धे व्यासपीठावर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला, पण त्याआधीच छत्रपतींनी खऱ्या अर्थाने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. शिवसृष्टीला आम्ही मेगा टुरीझमचा दर्जा दिला आहे, मात्र हे पर्यटन स्थळ नव्हे. हे प्रेरणास्थळ आहे. श्रीमंत योगी असलेल्या थोर पुरूषाचे हे मंदिर आहे. इथे जे काही सुरू आहे ते काम अतिशय सुरेख आहे. शिवराय लढवय्ये होतेच, पण ते उत्तम प्रशासक होते. कोणीही कोणावर अन्याय करू शकत नव्हते कायदा व सुव्यवस्थेची स्थिती त्यांनी निर्माण केली. त्यांचे असे सगळे पैलू स्रुष्टीतून पुढे यावेत. त्यासाठी आमच्याकडून आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक नानासाहेब जाधव यांचेही भाषण झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी प्रास्तविकात शिवसृष्टीची माहिती दिली. दुसऱ्या व चौथ्या टप्प्यात काय असेल ते त्यांनी सांगितले. स्वराज, स्वधर्म, स्वभाषा या महाराजांच्या त्रिसुत्रीवर आधारित ही शिवसृष्टी असेल असे ते म्हणाले. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व पाहुण्याचा सत्कार करण्यात आला. विश्वस्त विनित कुबेर यांनी आभार व्यक्त केले.