सुप्रियाताई,आम्ही कोणत्याही चौकशीला तयार! महापौरांचं खासदार सुळे यांच्या 'त्या' मागणीला प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 19:18 IST2021-06-28T19:17:57+5:302021-06-28T19:18:36+5:30
खासदार सुप्रिया सुळे आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात पुण्यातील कचरा प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

सुप्रियाताई,आम्ही कोणत्याही चौकशीला तयार! महापौरांचं खासदार सुळे यांच्या 'त्या' मागणीला प्रत्युत्तर
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांना काही महिन्यांचा अवधीच बाकी असताना शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेतेमंडळींचे पुणे दौरे वाढले आहे, तसेच महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये देखील आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडू लागल्या आहेत. याचवेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेच्या माध्यमातून कचरा प्रकल्पासाठी जवळपास २०० कोटी रुपये देण्यात आले आहे. मात्र त्या पैशातून कोणत्याही प्रकाराच्या उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे हा निधी गेला कुठं, असा प्रश्न निर्माण करत त्याची सीबीआय व ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. याच मागणीला आता भाजपच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे महापालिका निवडणुकाजवळ आल्यानेच सुप्रिया सुळेंना पुण्याच्या कचरा प्रश्नाची आठवण झाली आहे. त्यांनी कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी ईडीमार्फत करण्याची मागणी केली आहे. मात्र,सुळे यांनी ईडीमार्फत चौकशीची मागणी करणे म्हणजे त्यांचा केंद्रीय तपास यंत्रणांवर असलेला विश्वास आहे. आता अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांच्या ईडी चौकशीबाबतीतही सुप्रियाताईंनी हाच विश्वास कायम ठेवावा.तसेच आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला जाण्यास तयार आहोत असेही स्पष्टपणे सांगितले.
सुप्रिया सुळे यांची खासदारकीची ही तिसरी टर्म आहे. २०१४ पर्यंत आणि २०१९ नंतर त्यांचे बंधू अजितदादा यांनी पुण्याचे नेतृत्व केले आहे. तरीही पुण्याचा कचरा प्रश्न सोडवण्यात यश अद्याप आलेलं नाही, असेच त्यांना म्हणायचे आहे का ? उलट गेल्या ४ वर्षात आम्ही कचरा व्यवस्थापनाबाबत केलेल्या प्रयत्नांची दखल राष्ट्रीय पातळीवर सातत्याने घेतली जात आहे. अगदी कालच पुण्याच्या वेस्ट मॅनेजमेंटची दखल केंद्र सरकारने घेतली असेही महापौरांनी सांगितले.
पुढे मोहोळ यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जवळपास ६ नवे प्रकल्प हे भाजपच्या काळात म्हणजे गेल्या चार-साडेचार वर्षांत सुरू झाले. पुणे महानगरपालिका भाजपकडे आल्यानंतर शहराच्या कचरा प्रक्रियेची क्षमता १२०० मेट्रिक टनावरून १८०० मेट्रिक टनापर्यंत वाढवली गेली. याचीही माहिती महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात 'अॅक्टिव्ह' होत असलेल्या सुप्रिया सुळे यांनी घ्यावी असाही टोला लगावला.
राष्ट्रवादीवर टीका करताना मोहोळ म्हणाले, आपल्या पक्षाने तर अनेक सुरू होणारे प्रकल्प तोडफोड करून जाळपोळ करून बंद पाडले. मात्र केवळ महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कचऱ्यावर झालेल्या खर्चाची मागणी करणे म्हणजे ताईंनी स्वतःच्याच अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
पुण्यातील रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाची खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (दि.२८) पाहणी केली. यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये देशभरातील अनेक नेत्यांची सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी करण्यात येत आहे.मात्र, पुणे महापालिकेच्या माध्यमातून कचरा प्रकल्पासाठी जवळपास २०० कोटी रुपये देण्यात आले आहे. परंतू, त्या पैशातून आजपर्यंत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे हा निधी गेला कुठं, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली होती.