बारामती : सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आनंद व्यक्त केले आहे. सुनेत्रा पवार यांना संधी मिळाली, याचा आम्हाला आनंद असल्याचे त्यांनी बारामतीतील गोविंदबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या दोन दिवसांत शपथविधी झाल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला आहे.
पवार म्हणाले, अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे आम्ही सर्वजण मोठ्या संकटातून जात आहोत. “या परिस्थितीत परस्परांना धीर देणे आणि पुढे कसे जायचे, यावर आमचे लक्ष आहे. कोणत्याही राजकीय निर्णयावर सध्या कुणाशी चर्चा सुरू नाही,”असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या स्मारकाबाबत विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “ज्या संस्थेच्या जागेची चर्चा सुरू आहे, त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. त्यामुळे मला माहिती असायला हवी. अद्याप याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. सर्व विश्वस्त एकत्र बसून निर्णय घेतला जाईल. सध्या स्मारकावर चर्चा करणे योग्य नाही.”
विमान अपघाताबाबत काही नेत्यांकडून व्यक्त केल्या जात असलेल्या शंकांवर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, *“मी सुरुवातीलाच सांगितले आहे, अधिकृत माहिती येईपर्यंत उगीच शंका घेणे योग्य नाही.”
शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली असती, तर अजित पवारांनी मला त्याची कल्पना दिली असती, तसेच विलीनीकरणाचा मुद्दा होता तर शरद पवार एनडीएसोबत गेले असते का, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “या विलीनीकरणाच्या चर्चेत ते कुठेच नव्हते. मग माझ्याबाबत उल्लेख करण्याचा त्यांना काय अधिकार आहे, हेच मला समजत नाही,” अशा शब्दांत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
अर्थसंकल्प समाधानकारक; पण विकासासाठी ठोस पावले अपेक्षित
केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, “सामान्य माणसाला यातना होतील, असा नवा कर टाळण्यात आला आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र देशाच्या विकासाला गती देणारी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा होती.”
लष्करप्रमुखांनी काही लिहिले असेल, तर त्यावर चर्चा होणे गरजेचे
अमेरिका-भारत करारासंदर्भात ते म्हणाले, “अमेरिकेने भारतावर कर आकारणीत काही प्रमाणात कपात जाहीर केली आहे. मात्र या कराराचे स्पष्ट चित्र काही दिवसांत समोर येईल. अमेरिकेकडून कृषी क्षेत्रातील निर्यातीसंदर्भात जी तरतूद जाहीर झाली आहे, ती भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.” दरम्यान, माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या लेखनाचा उल्लेख विरोधी पक्षनेत्यांनी केल्याबाबत पवार म्हणाले, “तो विरोधी पक्षनेत्याचा अधिकार आहे. लष्करप्रमुखांनी काही लिहिले असेल, तर त्यावर चर्चा होणे गरजेचे होते. त्यातून देशासमोरील वास्तव चित्र लोकांसमोर आले असते.”
Web Summary : Sharad Pawar expressed happiness over Sunetra Pawar becoming Deputy CM. He avoided commenting on trolls targeting NCP leaders after Ajit Pawar's brother's death. He also addressed the central budget, Indo-US relations and remarks made by the former army chief.
Web Summary : शरद पवार ने सुनेत्रा पवार के उपमुख्यमंत्री बनने पर खुशी जताई। उन्होंने अजित पवार के भाई के निधन के बाद ट्रोल हो रहे एनसीपी नेताओं पर टिप्पणी करने से परहेज किया। उन्होंने केंद्रीय बजट, भारत-अमेरिका संबंधों और पूर्व सेना प्रमुख द्वारा की गई टिप्पणियों पर भी बात की।