Pune | चिंचणी धरणातून घोड नदीत विसर्ग; अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 19:50 IST2023-03-10T19:48:50+5:302023-03-10T19:50:03+5:30
उन्हाळ्यात पिकांना पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त...

Pune | चिंचणी धरणातून घोड नदीत विसर्ग; अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा
रांजणगाव सांडस (पुणे) : पाणी पाटबंधारे विभागाने चिंचणी धरणातून घोड नदीत १४१० क्युसेक पाणी सोडले आहे. पाणी सोडल्याने अहमदनगर जिल्हा व पुणे जिल्ह्यातील शेतकरी समाधानी झाले आहेत. घोड नदीचे पात्र कोरडे ठाण इनामगावला दुष्काळ म्हणून लोकमतने सचित्र सर्वप्रथम बातमी लावली होती.
घोडनदीवर शिरसगाव काटा, गांधले मळा, ते सांगवी (ता. श्रीगोंदा) पर्यंत पाच बंधारे शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्यात आलेले आहेत. शिरुर व श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांतील वाडी वस्तीवरील हजारो एकर शेती ओलिताखाली आलेली आहे. परंतु बंधारे कोरडे ठाण पडल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे शेतातील पिके जळू लागली होती. ही शेती घोड नदीच्या बंधाऱ्यातील पाण्यावर अवलंबून आहे.
शेतकरी वर्गाने घोड नदीच्या बंधारा परिसरातून वैयक्तिक व सामुदायिक उपसा सिंचन योजना राबवून या भागात शेतीला पाणी फिरवले आहे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हे सर्व बंधारे कोरडे ठणठणीत पडलेले होते. बंधारे पाण्याने भरल्याने शेतकऱ्यांची पाण्याची समस्या सुटणार आहे. उन्हाळ्यात पिकांना पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.