जय मल्हार वॉटरपार्क अपघातात महिला गंभीर जखमी; व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 17:10 IST2026-04-08T17:09:20+5:302026-04-08T17:10:09+5:30
शिरुर पोलिस स्टेशन येथे जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र वॉटरपार्कचे मालक व व्यवस्थापक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जय मल्हार वॉटरपार्क अपघातात महिला गंभीर जखमी; व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल
मलठण : चिंचोली मोराची (ता. शिरुर) येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र व वॉटरपार्क येथे सहलीसाठी गेलेल्या महिलेस वॉटरपार्कमधील घसरगुंडीतून घसरून पडल्याने गंभीर दुखापत झाली आहे.यासंदर्भात शिरुर पोलिस स्टेशन येथे जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र वॉटरपार्कचे मालक व व्यवस्थापक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
करंदी (ता. शिरुर) येथील अश्विनी नप्ते (वय ३७) या त्यांच्या कुटुंबातील मुले व महिलांसोबत चिंचोली मोराची येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र वॉटरपार्क येथे सहलीसाठी गेल्या होत्या. वॉटरपार्कमध्ये खेळत असताना वॉटर स्लायडिंग करताना अश्विनी नप्ते या पाण्यातील घसरगुंडीतून खाली आल्यानंतर पाण्यात पडल्या. परंतु पाण्याची पातळी कमी असल्याने अश्विनी या जोरात आदळल्या गेल्याने त्या बेशुद्ध पडल्या.
पर्यटन केंद्र परिसरात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांनी खासगी रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अश्विनी यांचे पाठीचे चार मणक्यांना गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत किरण मल्हारी नप्ते (वय ३७, सध्या रा. भीमाजी कॉम्प्लेक्स लिंक रोड चिंचवड, मूळ रा. करंदी, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र वॉटरपार्कचे मालक व व्यवस्थापक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटिंग करीत आहेत.