बेबी कॅनॉलमध्ये वाढली जलपर्णी, डासांच्या त्रासाने नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:05 IST2025-01-02T11:05:38+5:302025-01-02T11:05:58+5:30

आरोग्य-पर्यावरण विभागाकडून जबाबदारीची ढकला-ढकल

Water lilies have grown in Baby Canal citizens are worried about the problem of mosquitoes | बेबी कॅनॉलमध्ये वाढली जलपर्णी, डासांच्या त्रासाने नागरिक हैराण

बेबी कॅनॉलमध्ये वाढली जलपर्णी, डासांच्या त्रासाने नागरिक हैराण

पुणे : हडपसर परिसरातील बेबी कॅनॉलमध्ये जलपर्णीची वाढ झाल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात डासांची पैदास झाली आहे. डासांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पर्यावरण विभागाला जलपर्णी काढण्याबाबत पत्र दिले आहे.

मात्र, बेबी कॅनॉल हा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येत असल्याने पर्यावरण विभागाने हात झटकले आहेत. त्यामुळे आरोग्य आणि पर्यावरण विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे. हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बेबी कॅनॉल आहे. हा बेबी कॅनॉल साडेसतरा नळी, अन्सारी फाटा, महादेवनगर, घुले वस्ती, कल्पतरू सोसायटी, अमरसृष्टी, लक्ष्मी कॉलनी, विठ्ठलनगर, मांजरी, फुरसुंगी, शेवाळवाडी आणि सायकरवाडी या परिसरातून जातो.

या बेबी कॅनॉलमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. या जलपर्णीमुळे डासाचे प्रमाण वाढले आहे. डांसामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांच्या तक्रारीनुसार कीटकनाशक औषधाची फवारणी बेबी कॅनॉलमध्ये सुरू केली. मात्र, जलपर्णीमुळे औषध फवारणीचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने पर्यावरण विभागाला पत्र पाठविले. या पत्रात बेबी कॅनॉलमधील जलपर्णी काढावी, अशी मागणी करण्यात आली.

जलपर्णीमुळे डासांची पैदास वाढल्याने आरोग्य विभागाला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे, असेही पत्रात नमूद केले. यावर पर्यावरण विभागाने बेबी कॅनॉल आपल्या कार्यकक्षेत नसून, पाटबंधारे विभागाकडे असल्याची भूमिका घेतली आहे. आरोग्य विभागाने आम्हाला पत्र पाठविण्याऐवजी थेट पाटबंधारे विभागाला पत्र पाठवावे, अशी भूमिका पर्यावरण विभागाने आता घेतली आहे.

Web Title: Water lilies have grown in Baby Canal citizens are worried about the problem of mosquitoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.