वॉचमननेच ज्येष्ठाला घातला २४ लाखांचा गंडा; कुटुंबापासून लांब राहत असल्याचा घेतला गैरफायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 17:27 IST2025-03-28T17:27:22+5:302025-03-28T17:27:38+5:30

आरोपींनी संगनमत करून ज्येष्ठासोबत ओळख वाढवून, त्यांना व्यसनाच्या आहारी नेऊन, वेळोवेळी एकत्र बसून फसवणूक केली

Watchman duped senior citizen of Rs 24 lakh; took advantage of him living far from family | वॉचमननेच ज्येष्ठाला घातला २४ लाखांचा गंडा; कुटुंबापासून लांब राहत असल्याचा घेतला गैरफायदा

वॉचमननेच ज्येष्ठाला घातला २४ लाखांचा गंडा; कुटुंबापासून लांब राहत असल्याचा घेतला गैरफायदा

पुणे: कुटुंबापासून लांब एकटे पुण्यात राहणे ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले. ते एकटे राहत असल्याचा गैरफायदा घेत वॉचमनने मेहुण्याच्या मदतीने त्यांच्या बँक खात्यातील २४ लाख ४८ हजार रुपये वेगवेगळ्या अनोळखी व्यक्तींच्या खात्यांवर ट्रान्सफर केले. त्यासाठी ज्येष्ठाला आरोपीने व्यसन देखील लावले.

याप्रकरणी ज्येष्ठाच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस तपासात हा प्रकार वॉचमनने केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. इफ्तिकार रहीमखान पठाण (३१, रा. गोवंडी, मुंबई) आणि मोहम्मद हनीफ मोहम्मद अफसर (५२, रा. म्हसोबा मंदिराच्या पाठीमागे, काळेपडळ, हडपसर, मूळ रा. पातूर, जि. अकोला), अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी स्नेहल अशोक झरेकर (रा. मगरपट्टा सिटी, सध्या रा. बंगळुरू) यांनी फिर्याद दिली आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी स्नेहल यांचे वडील अशोक शंकर झरेकर (६४) यांच्या अकाउंटचा ॲक्सेस घेऊन अनोळखी व्यक्तींच्या बँक खात्यांवर २४ लाख ४८ हजार रुपये ट्रान्सफर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) नीलेश जगदाळे, कर्मचारी संदीप राठोड, सचिन गोरखे, गायत्री पवार, तेजस पांडे हे तपास करत असताना, त्यांना अशोक झरेकर यांच्या दैनंदिन गरजेच्या कामासाठी वॉचमन हनीफ मदत करत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी अशोक झरेकर यांच्या बँक खात्यावरून पैसे कुणाच्या खात्यावर गेले याची पडताळणी केली असता, ती रक्कम इफ्तिका खान आणि नूर जहाँ यांच्या बँक खात्यांवर गेल्याचे समजले. तसेच, या घटनेनंतर हनीफ काम सोडून फरार झाल्याचे देखील समोर आले. पोलिसांना तांत्रिक तपासात हनीफ आणि इफ्तिकार खान हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे आढळले. यानंतर पोलिसांच्या एका पथकाने मुंबईतील गोवंडी येथे जात इफ्तिकार रहीमखान पठाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून हनीफबाबत माहिती घेतली असता, तो सध्या शहरातील हांडेवाडी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत दोघांना अटक केली.

पोलिस तपासात मोहम्मद हनीफ आणि इफ्तिकार हे नात्याने एकमेकांचे मेहुणे असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्ह्याची कबुली देखील दिली. तसेच, हनीफला झरेकर हे वेगवेगळी कामे सांगत होते. त्यामुळे अशोक झरेकर हे एकटे राहत असल्याचे हनीफला समजले होते. यानंतर आरोपींनी संगनमत करून झरेकर यांच्यासोबत ओळख वाढवून, त्यांना व्यसनाच्या आहारी नेऊन, वेळोवेळी एकत्र बसून त्यांच्या मोबाइलचा व बँकेचा ॲक्सेस घेऊन झरेकर यांच्या बँक अकाउंटवरून पैसे आरोपींनी स्वत:च्या व नातेवाइकांच्या बँक अकाउंटवर परस्पर वळवून फसवणूक केल्याचे सांगितले. आरोपींना न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपास नीलेश जगदाळे करत आहेत.

Web Title: Watchman duped senior citizen of Rs 24 lakh; took advantage of him living far from family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.