ये - जा करणाऱ्या नागरिकांना इशारे; नवले पुलाजवळ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 16:46 IST2025-04-29T16:46:41+5:302025-04-29T16:46:59+5:30
कारवाई केल्यानंतर परिस्थिती सुधारलेली दिसते, मात्र काही दिवसानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती असते

ये - जा करणाऱ्या नागरिकांना इशारे; नवले पुलाजवळ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल
पुणे: नवले पुलाजवळ वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांवर सिंहगड रस्ता पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध अधिनियमान्वये (कलम ८) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी ज्योती हुलावळे यांनी फिर्याद दिली आहे.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरातील नवले पुलाजवळ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला थांबतात. त्या रस्त्यावरून येणाऱ्या - जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना इशारे करतात. या महिलांमुळे परिसरात राहणाऱ्या महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल होते. अनेकवेळा काही अंबच शोकीन या महिलांमुळे रहिवाशी महिलांच्याही मागे पुढे फिरत असतात. या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी नवले पूल परिसरात थांबणाऱ्यी तीन महिलांना ताब्यात घेवून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निंबाळकर तपास करत आहेत.
असाच प्रकारे कात्रजकडून नवले पुलाकडे येणाऱ्या रस्त्याच्या सेवा रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला थांबलेल्या असतात. या महिला लॉजच्या आसपासच थांबलेल्या असतात पोलिसांची गाडी दिसल्यानंतर तेथेच आडबाजूला थांबतात, पोलिसांची गाडी गेल्यानंतर पुन्हा रस्त्याच्या कडेला येऊन थांबतात. या भागातील रहिवाशांना विशेषत : महिलांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. यापूर्वी पोलिसांनी दोन्ही ठिकाणी कारवाई केली होती. कारवाई केल्यानंतर परिस्थिती सुधारलेली दिसते, मात्र, काही दिवसानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती असते.