वॉर्डची काच फोडली; ईसीजी यंत्राची तोडफोड, सुरक्षारक्षकाला मारहाण, ससूनमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 18:36 IST2025-07-16T18:36:18+5:302025-07-16T18:36:42+5:30
नातेवाईकांना भेटण्यासाठी वेळ ठरवून दिली आहे. त्यामुळे वॉर्डात जाता येणार नाही, असे सुरक्षारक्षकाने सांगितले असता दोघांनी गोंधळ घातला

वॉर्डची काच फोडली; ईसीजी यंत्राची तोडफोड, सुरक्षारक्षकाला मारहाण, ससूनमधील धक्कादायक प्रकार
पुणे: ससून रुग्णालयाच्या आवारात काही दिवसांपूर्वीच पुणेपोलिसांनी एका स्वतंत्र चौकीची स्थापना केली. त्याठिकाणी एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती केली. त्यामुळे ससून रुग्णालयात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल असा समज होत असतानाच रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ४० मध्ये गोंधळ घालून तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. एका महिलेसह अन्य एकाने गोंधळ घालत प्रवेशद्वाराची काच फोडून ईसीजी यंत्राची तोडफोड केली, तसेच सुरक्षारक्षकाला धमकावून धक्काबुक्की केली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच तोडफोड केल्याप्रकरणी स्वप्नील बारकू धनगर (२५) आणि राणी बाबुराव पाटील (२५, दोघे रा. मांजरी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरक्षारक्षक संदीप ज्ञानोबा जाधव (२७, रा. सदानंद नगर, मंगळवार पेठ) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयात आरोपी धनगर व पाटील यांच्या नात्यातील एकजण उपचार घेत आहे. मंगळवारी (दि. १५) दुपारी एकच्या सुमारास ससूनमधील वॉर्ड क्रमांक ४० च्या परिसरात धनगर आणि पाटील आले होते. त्यांनी उपचार घेणाऱ्या नातेवाईकाला भेटायचे आहे, असे सांगितले. नातेवाईकांना भेटण्यासाठी वेळ ठरवून दिली आहे. त्यामुळे वॉर्डात जाता येणार नाही, असे सुरक्षारक्षक जाधव यांनी सांगितले. यावरून धनगर आणि पाटील यांनी रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जाधव यांनी त्यांना गोंधळ घालू नका, असे सांगितले. परंतु, त्यांनी गोंधळ घालत सुरक्षारक्षक जाधव आणि सहकाऱ्यांना धक्काबुक्की केली. तसेच, शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. वॉर्ड क्रमांक ४० च्या प्रवेशद्वाराची काच फोडली, तसेच ईसीजी यंत्राची तोडफोड केली. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.