युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे; शांतता हाच खरा विजय - मनोज नरवणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 13:39 IST2025-05-12T13:36:58+5:302025-05-12T13:39:14+5:30

युद्धासाठी आनंद व्यक्त करणे योग्य नाही, प्रत्येक समस्येचा पहिला उपाय संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच असावा

War and violence should be seen as a last resort peace is the true victory Manoj Naravane | युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे; शांतता हाच खरा विजय - मनोज नरवणे

युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे; शांतता हाच खरा विजय - मनोज नरवणे

पुणे : युद्ध ही कोणतीही रोमँटिक गोष्ट नाही, ना ती एखाद्या बॉलिवूडच्या चित्रपटाची कथा आहे. मृत्यू, निर्वासित समस्या, कुटुंबांचे विघटन असे अदृश्य पण खोल सामाजिक नुकसान युद्धामुळे होते. युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे. अविवेकी लोकांनी आपल्यावर युद्ध लादले. युद्धासाठी आनंद व्यक्त करणे योग्य नाही. प्रत्येक समस्येचा पहिला उपाय संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच असावा. युद्धातून कोणाचाही खरा विजय होत नाही. शांतता हाच खरा विजय आहे, असे मत भारतीय सैन्याचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केले.

द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेच्या पुणे विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात नरवणे बोलत होते. एरंडवणे येथील डॉ. कलमाडी श्यामराव शाळेच्या शकुंतला शेट्टी ऑडिटोरियममध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किशोर पंप प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक किशोर देसाई, माजी अध्यक्ष सीएमए डॉ. धनंजय जोशी, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएमए) माजी अध्यक्ष सीएमए अमित आपटे, माजी केंद्रीय समिती सदस्य सीएमए संजय भार्गवे, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया, पुणे शाखेचे अध्यक्ष नीलेश भास्कर केकाण, केंद्रीय समिती सदस्य सीएमए नीरज जोशी आणि वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे माजी अध्यक्ष सीएमए चैतन्य मोहरीर यांची यावेळी उपस्थिती होती.
नरवणे यांनी बोलताना, संरक्षणासाठी किती खर्च करावा आणि शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यांसाठी किती खर्च करावा हा वाद फार जुना आहे. संरक्षणातील खर्च ही उधळपट्टी नसून देशासाठी आवश्यक ‘इंश्योरेन्स’ आहे. सज्ज लष्करामुळे संघर्ष टळतो आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. युद्ध महागडे असते त्याची नुकसान भरपाई खर्चिक असते. म्हणून ही गुंतवणूक देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे.

युद्धानंतर भारतीय सैन्य नेहमीच शांततेकडे परतते आणि तसेच राहायला हवे. विशेषतः मातृदिनाच्या निमित्ताने हे सांगणे महत्त्वाचे आहे की, कोणत्याही आईला आपले मूल युद्धात गमवावे लागू नये. आपण राष्ट्रीय सुरक्षेकडे बघताना बहुतांश वेळा ते केवळ लष्करी दृष्टिकोनातून पाहतो. तर आपापल्या क्षेत्रात काम करत असताना आपण सर्व जण देशाच्या सुरक्षेसाठी काही ना काही योगदान देतो, असे मत व्यक्त केले. किशोर देसाई यांनी, देशासाठी आपण छोट्या प्रमाणात का होईना, काही ना काही योगदान नक्की देऊ शकतो. सैन्याचा त्याग हा सर्वोच्च असतो, तो आपण करू शकणार नाही, पण त्यांच्या समर्पणातून आपण प्रेरणा नक्कीच घेऊ शकतो, असे मत व्यक्त केले.

Web Title: War and violence should be seen as a last resort peace is the true victory Manoj Naravane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.