पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीबाबत १०० हून अधिक गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची सुरुवात सकाळी ७ वाजताच करावी, या आपल्या भूमिकेवर ठाम राहून प्रशासनासमोर नवा पेच निर्माण केला आहे. त्यामुळे यावर पोलिस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्व मंडळांचे लक्ष लागून आहे. पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक शहराच्या सांस्कृतिक अस्मितेचा भाग आहे. सकाळच्या वेळेत सुरू होणाऱ्या मिरवणुका संपूर्ण दिवसभर सुव्यवस्थित पार पडतात, असा पूर्वानुभव मंडळांकडे आहे. त्यामुळे सकाळी ७ वाजता मिरवणूक सुरू करण्याचा आग्रह केवळ धार्मिक नसून व्यवस्थापनदृष्ट्याही महत्त्वाचा असल्याचे मंडळांचे म्हणणे आहे.
त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीच्या लांबणाऱ्या वेळेवरून निर्माण झालेल्या तिढ्यावर पोलीस आयुक्त कार्यालयातील गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकीत तोडगा निघू शकलेला नाही. शहरातील सर्व गणेश मंडळांची एकत्रित बैठक घेऊन समन्वयाने हा प्रश्न सोडवावा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. याला मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली असून, दोन दिवसांत संयुक्त बैठक घेऊन याबाबत चित्र स्पष्ट करू, असे आश्वासन दिले आहे.
अशातच कसबा पेठेतील जनार्दन पवळे संघ मंडळाने सकाळी ७ वाजता विसर्जन मिरवणूक सुरु होणार असल्याचा थेट फ्लेक्स लावला आहे. या फ्लेक्सची पुणे शहरात चर्चा होऊ लागली आहे. विसर्जन मिरवणूक प्रस्थान बेलबाग चौक सकाळी ७ वाजता असा मजकूर या फ्लेक्सवर लिहिण्यात आलेला आहे. शहरातील मानाच्या पाच गणेश मंडळांसह इतर तीन मंडळांना प्रशासनाकडून झुकते माप दिले जाते. या मंडळांमुळे आमच्यावर अन्याय होतो, आम्हाला वेळ मिळत नाही, असा आरोप शहरातील विशेषतः पूर्व भागातील मंडळांकडून केला जात आहे. त्यातच यंदा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडई गणेश मंडळाने मानाच्या पाच गणपतींनंतर आम्ही मिरवणूक काढणार, असे जाहीर केल्याने विसर्जन मिरवणुकीतील मंडळांच्या नंबरवरून तिढा निर्माण झाला आहे. आता मंडळे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.