गुंडागर्दी करून विधीमंडळाच्या पावित्र्याचा भंग; पुन्हा निवडणुका घ्या, पुण्यातील माजी आमदारांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 17:13 IST2025-07-21T17:12:16+5:302025-07-21T17:13:01+5:30
सरकारचे आणि विरोधक दोघांच्या आमदारांनी आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत, याचे कायम भान ठेवून काम करायचे असते

गुंडागर्दी करून विधीमंडळाच्या पावित्र्याचा भंग; पुन्हा निवडणुका घ्या, पुण्यातील माजी आमदारांची मागणी
पुणे : लोकशाही राज्य व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना शत्रू मानू नये. नेमके तेच आताच्या विधानसभेत होत आहे. त्यामुळेच गुंडागर्दी करून विधिमंडळाच्या पावित्र्याचा भंग केला जात आहे, अशी खंत माजी आमदारांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे केली. तिकडमबाजी करून आलेले हे सरकार बरखास्त करून नव्याने निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांनी यावेळी केली.
विधिमंडळ आवारात झालेल्या गुंडागर्दीच्या निषेधार्थ माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, युक्रांदचे संस्थापक डॉ. सप्तर्षी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, जयदेव गायकवाड या माजी आमदारांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. ॲड. एल. टी. सावंत, संयोजक राहुल डंबाळे यावेळी उपस्थित होते. लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात पुन्हा प्रवेश करण्याची आमची इच्छाच या गुंड वृत्तीमुळे मेली असल्याची खंत सर्वांनी एकमताने व्यक्त केली.
डॉ. सप्तर्षी म्हणाले, राज्यातील साडेबारा कोटी जनतेने हे २८८ प्रतिनिधी निवडून दिलेले असतात. बहुमत प्राप्त होते, त्यांचे सरकार होते, उर्वरित विरोधक होतात; मात्र दोघांनीही आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत, याचे कायम भान ठेवून काम करायचे असते. सध्या मात्र गंगा उलट्या दिशेने वाहताना दिसते आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे सत्ताधारी पक्षाचे आहेत, मुख्यमंत्र्यांचे विशेष लाडके आहेत. त्यांनी सांगितलेले विरोधकांना अर्वाच्य भाषेत शिव्यांची लाखोली वाहण्याचे काम ते करीत असतात. कुप्रसिद्ध गुन्हेगारांना घेऊन ते विधानसभा आवारात आले. तिथे या गुन्हेगारांनी विरोधी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. हे सगळे सर्वांनी पाहिले. त्यामुळेच आता जनतेनेच सरकार बरखास्त करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करायला हवी.
फुटाणे यांनी या घटनेचा आम्ही सगळेच तीव्र निषेध करून तो जनतेसमोर नोंदवीत आहोत. ॲड. चव्हाण यांनी राज्याला गृहमंत्री आहे की नाही असा प्रश्न पडला असल्याचे सांगितले. वास्तविक, या घटनेनंतर तातडीने पोलिसी कारवाई व्हायला हवी. ते होत नाही व शेती, बेरोजगारी या राज्याच्या गंभीर विषयांवर चर्चाही होत नाही. माजी मंत्री शिवरकर यांनी हा राज्याच्या राजकीय संस्कृतीला कलंक लावणारा प्रकार असल्याची टीका केली. अन्य आमदारांनीही या घटनेचा निषेध केला. कोण कोणाचा जवळचा आहे याची फिकीर न करता घटनेशी संबंधित सर्वांवर आवश्यक ती पोलिसी कारवाई त्वरित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.