गावांचा संपर्क तुटला; पिंपळगाव जोगा धरणातून पाणी सोडल्याने पुष्पावती नदीला पूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 12:53 IST2025-09-28T12:51:06+5:302025-09-28T12:53:40+5:30
पिंपळगाव जोगा, सांगणारे, कोल्हेवाडी आदी गावांचा संपर्क तुटला आहे. अचानक पाटबंधारे विभागाने पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

गावांचा संपर्क तुटला; पिंपळगाव जोगा धरणातून पाणी सोडल्याने पुष्पावती नदीला पूर
ओतूर : पिंपळगाव जोगा धरणातून (दि. २८) रात्री तब्बल २७८० क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानं पुष्पावती नदीला मोठा पूर आला आहे. या पूरामुळे परिसरातील लहानमोठे पूल पाण्याखाली गेले असून वाहतूक ठप्प झाली आहे.
यात सर्वाधिक परिणाम पिंपळगाव जोगा येथील पुलावर झाला असून पुलावरून पाणी वाहत असल्याने पिंपळगाव जोगा, सांगणारे, कोल्हेवाडी आदी गावांचा संपर्क तुटला आहे. अचानक पाटबंधारे विभागाने पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
परिसरातील अंदाजे ८० ते १०० मोटारी पाण्याखाली गेल्या, तसेच ४ ते ५ जनावरे दगावली. शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी शिरले असून पिकअप गाडी व मंदिरही पाण्यात गेले आहे. नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे.
स्थानिकांच्या मते, पूर्वी ५०० ते १००० क्युसेक पाणी सोडले जात होते. मात्र यावेळी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने लाखोंचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. पाणी शिरलेल्या प्रत्येक मोटरच्या दुरुस्तीसाठी सुमारे २५ हजार रुपये खर्च येणार असल्याचे स्थानिक ग्रामस्थ पंकज हांडे, नवनाथ सुकाळे व राजू घाडगे यांनी सांगितले.
दरम्यान, कुकडी पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले की, धरण ९३ टक्के भरले असल्याने व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी सोडण्यात आले. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन विभागाने केले आहे.