गावचा सरपंच मुख्यमंत्री होऊ शकतो, दिलीप वळसे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 23:25 IST2018-11-14T23:25:22+5:302018-11-14T23:25:50+5:30
दिलीप वळसे-पाटील : ग्रामस्थांनी केला शांतारामबापूंचा हृद्य सत्कार

गावचा सरपंच मुख्यमंत्री होऊ शकतो, दिलीप वळसे-पाटील
भुलेश्वर : ग्रामीण भागातून गावपातळीवर विकासाचे काम करणारे नेतृत्व पुढे आले. त्यातूनच राज्यात आमदार, खासदार, मंत्री व मुख्यमंत्री झालेले अनेक आहेत. त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख होय, म्हणूनच ग्रामस्थांनी नेतृत्वाची जडणघडण जाणीवपूर्वक करावी. गावात चांगले काम करणारा सरपंच भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो, असे मत विधान परिषदेचे माजी सभापती दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केली.
मौजे पिसर्वे (ता. पुरंदर) येथील ग्रामस्थांच्यावतीने माजी सरपंच शांतारामबापू कोलते यांचा अमृतमहोत्सव व प्रगतिशील शेतकरी सुरेश विनायक कोलते यांच्या एकसष्टीनिमित्त वळसे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गावातील नागरिकांच्या सहकार्याने विकासकामे करू शकलो. सर्वांना बरोबर घेऊन गावचे गावपण जपले. पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, खरीप बंधारे, विजेचे उपकेंद्र, बँक, वाचनालय आदी सुविधा निर्माण केल्या. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मागे लागून पुरंदर उपसासिंचन योजनेचे पाणी गावच्या शिवारात फिरवल्यामुळे हरितक्रांती झाल्याच्या भावना सत्काराला उत्तर देताना शांतारामबापू व सुरेश कोलते यांनी व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विजय कोलते यांनी प्रास्ताविक केले. संभाजी कोलते, तानाजी कोलते, जालिंदर कामठे, सुदाम इंगळे, अशोक टेकवडे, प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी शुभेच्छा दिल्या.