विजयस्तंभ अभिवादन! अनुयायींना कायमस्वरूपी सुविधेच्या अनुषंगाने कार्यवाही करा - संजय शिरसाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 12:55 IST2024-12-29T12:53:46+5:302024-12-29T12:55:02+5:30
पुणे पोलिस दलाचे ६ हजार, पुणे ग्रामीणचे ३ हजार व पिंपरी चिंचवड पोलिस दलाचे १ हजार इतके मनुष्यबळ बंदोबस्तासाठी लावण्यात येत आहे

विजयस्तंभ अभिवादन! अनुयायींना कायमस्वरूपी सुविधेच्या अनुषंगाने कार्यवाही करा - संजय शिरसाट
पुणे: पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादनानिमित्त येणाऱ्या अनुयायींना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने चोख व्यवस्था करा, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिले. दरवर्षी त्याच-त्याच सुविधा पुन्हा कराव्या लागत असल्याने कायमस्वरूपी सुविधा तयार करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. हवेली तालुक्यातील पेरणे येथे १ जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते.
दरवर्षी साजऱ्या करण्यात येणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी आतापर्यंत १४ कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात आला आहे. या ठिकाणी राज्यभरातून लाखो अनुयायी येत असल्याने त्यांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. अनुयायींची कोणतीही गैरसोय होणार नाही, त्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उत्तम नियोजन करावे. विविध सामाजिक संघटनांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना विचारात घेऊन प्रशासनाने कार्यवाही करावी. येत्या काळात परिसराचा कायमस्वरूपी विकास करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल, असेही शिरसाठ म्हणाले.
१०० कोटी रुपयांचा निधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभास भेट दिल्याच्या घटनेला २०२७ मध्ये १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर परिसराचा सर्वांगीण विकास करण्याकरिता १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ म्हणाले.
यावेळी विविध विभागांनी आपल्या तयारीचा आढावा सादर केला. पुणेपोलिस दलाचे ६ हजार, पुणे ग्रामीणचे ३ हजार व पिंपरी चिंचवड पोलिस दलाचे १ हजार इतके मनुष्यबळ बंदोबस्तासाठी लावण्यात येत आहे. जलद प्रतिसाद पथक, सॅटेलाइट फोन, वायरलेस सुविधा आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. पीएमपीएमएलच्या बसेसच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. पार्किंग जागा वाढविल्या असून ४५ ठिकाणी पार्किंग करण्यात येत आहेत. विजयस्तंभ परिसरात रॅम्प, सुलभ दर्शनासाठी रांगा व्यवस्थापन, पुस्तकांसाठी १०० बुक स्टॉल उभारण्यात आले आहेत. विजयस्तंभावर रोषणाई व फुलांची सजावट करण्यात येणार आहे. आरोग्य सुविधांसाठी ४३ रुग्णवाहिका नेमण्यात येणार असून पुरेशी आरोग्य पथके ठेवण्यात येत आहेत. १८ खासगी दवाखान्यातील खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठ्यासाठी अनुयायांसाठी १५० व पोलिस दलाला ४० पाण्याचे टँकर नेमण्यात आले आहेत. ४०० शौचालये उभारण्यात येणार आहेत. ९ हिरकणी कक्ष आणि ज्येष्ठांसाठी ७ निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.