पुणे जिल्ह्यातील विजयस्तंभ अभिवादन अन् पहिल्या बैलगाडा शर्यतीवर ओमायक्रॉनचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 07:04 PM2021-12-27T19:04:43+5:302021-12-27T19:04:57+5:30

ओमायक्रॉन व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध लागू केले

vijayasthambh abhivadan and first bullock cart race under restriction about Omicron Variant and corona virus in pune | पुणे जिल्ह्यातील विजयस्तंभ अभिवादन अन् पहिल्या बैलगाडा शर्यतीवर ओमायक्रॉनचे सावट

पुणे जिल्ह्यातील विजयस्तंभ अभिवादन अन् पहिल्या बैलगाडा शर्यतीवर ओमायक्रॉनचे सावट

googlenewsNext

पुणे : दर वर्षी हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारीला लाखो लोक येतात. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. परंतु ओमायक्रॉन व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध लागू केले असून,  जिल्ह्यात 1 जानेवारी रोजी होणा-या विजयस्तंभ अभिवादन व बैलगाडा शर्यती संदर्भात काय निर्णय घ्यावा, याबाबत जिल्हाधिका-यांनी राज्य शासनाकडे मार्गदर्शक सुचना मागविल्या आहेत. 

जिल्ह्यात दर वर्षी हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम आयोजित केला जातो. कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे गेले दोन वर्षे हा कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने, दूरदर्शन व अन्य माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला जातो. यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्याने, सर्व शाळा- महाविद्यालय सुरू झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू केली. जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण नियोजन देखील पूर्ण झाले आहे. परंतु दोन दिवसांपूर्वीच शासनाने कोरोना व ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुण्यासह संपूर्ण राज्यात पुन्हा काही निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये भविष्यात आणखी वाढ होऊ शकते.

तसेच न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर पुणे जिल्ह्यातील पहिल्या बैलगाडा शर्यतीला 1 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी लेखी परवानगी दिली आहे. या दोन्ही कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करू शकतात. यामुळेच ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमांवर निर्बंध अधिक कडक करायचे किंवा कसे, या संदर्भात मार्गदर्शक सुचना शासनाकडून मागविल्या आहेत.

Web Title: vijayasthambh abhivadan and first bullock cart race under restriction about Omicron Variant and corona virus in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.