Vidhan Sabha 2019 : भाजप-शिवसेनेच्या दुखावलेल्या कार्यकर्त्यांवर काँग्रेस आघाडीचा गळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 13:28 IST2019-10-01T13:28:11+5:302019-10-01T13:28:22+5:30
‘राष्ट्र्वादी’चे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी ‘सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार’ असे सूचक वक्तव्य करून ‘आयारामां’चे स्वागत करण्याची तयारी दाखवली आहे...

Vidhan Sabha 2019 : भाजप-शिवसेनेच्या दुखावलेल्या कार्यकर्त्यांवर काँग्रेस आघाडीचा गळ
पुणे : भारतीय जनता पक्षाने पुण्यातील उमेदवारांची नावे निश्चित करून आघाडी घेतली असली तरी त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील अनेक इच्छुक आणि त्यांचे समर्थक दुखावले गेले आहेत. या दुखावलेल्या नेते-कार्यकर्त्यांना बंडाची हवा देऊन आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने प्रयत्न सुरू केले आहेत. ‘राष्ट्र्वादी’चे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी ‘सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार’ असे सूचक वक्तव्य करून ‘आयारामां’चे स्वागत करण्याची तयारी दाखवली आहे. भाजप-शिवसेनेकडून तिकिटाची खात्री नसलेल्या मंडळींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही पर्याय चाचपण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेना आणि भाजपच्या युतीचा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला. मात्र, जागावाटपाचे चित्र स्पष्ट नाही. भाजपने शिवसेनेकरिता पुण्याकरिता किमान दोन तरी जागा सोडाव्यात अशी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची भावना आहे. अन्यथा पुण्यातील शिवसेनेचे अस्तित्वच संपून जाईल, अशी चिंता शिवसैनिकांना आहे. सन २०१४ च्या विधानसभेत पुण्यातल्या आठही जागा गमावल्यापासून त्यानंतरच्या शिवसेनेची पीछेहाट झाली आहे. पुण्यातल्या सर्व मतदारसंघांवर भाजपचाच वरचष्मा राहील, अशी चिंता शिवसैनिकांना आहे.
शिवाजीनगर मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक निम्हण, हडपसरमधून महादेव बाबर, कोथरूडमधून चंद्रकांत मोकाटे इच्छुक आहेत. मात्र महायुतीची घोषणा होत असतानाच पु्ण्यातल्या आठही मतदारसंघांत भाजप उमेदवारांना कामाला लागण्याचा इशारा देण्यात आल्याने शिवसेनेच्या इच्छुकांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता मावळत चालली आहे. त्यामुळे या नेत्यांपुढे, काय भूमिका घ्यायची हा मोठा प्रश्न आहे. यातच कॉंग्रेस आघाडीकडून मंडळींना विचारणा होतेय.
काही मतदारसंघांत कॉंग्रेस आणि राष्टÑवादीकडे तगडे उमेदवार नाहीत. त्यामुळे शिवसेनेकडून तसेच भाजपतून येणाºया नेत्यांचे आघाडीमध्ये स्वागत होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, मधल्या काळातले कॉंग्रेसवासी आणि अलीकडच्या काही काळापासून पुन्हा शिवसैनिक झालेल्या निम्हण यांनी कॉंग्रेस आघाडीकडून लढण्याची तयारी दाखवल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनीही सर्वपक्षीय उमेदवार म्हणून कोथरूडमध्ये
चंद्रकात पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याच्या पर्यायाची चाचपणी सुरू आहे. मात्र अद्याप
तरी मोकाटे यांनी त्याला मान्यता दिलेली नाही. मनसे कॉंग्रेस आघाडीत नसेल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच जाहीर केल्याने मनसेने निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेनेतील इच्छुकांना मनसेचे दरवाजेही उघडे आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेतून आलेल्या एका नाराज नगरसेवकाला राज ठाकरे यांनी उमेदवारीही जाहीर केली आहे. हाच फॉर्म्युला मनसे पुण्यातही अंमलात
आणू शकते.
......
आता युतीचा निर्णय झाला आहे. थोड्याच दिवसांत पुण्यातील जागेचा प्रश्न सुटेल. प्रत्यक्षात अजून विश्वासार्ह माहिती पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यापर्यंत नाही. पुढील दिवसांत चित्र स्पष्ट होईलच. उद्धव ठाकरे यांचा आदेश शिवसैनिकांना बांधील असणार आहे.- पृथ्वीराज सुतार, शिवसेना, गटनेते पुणे महानगरपालिका
...........
आता कुठे युतीची घोषणा झाली. इतक्यात जागावाटपांविषयी बोलणे उचित ठरणार नाही. पुण्यात कुठल्या विधानसभा मतदारसंघाला जागा द्यायच्या, याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. दोन्ही पक्षांकडून जागेविषयी विचार घेतला जाईल. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. - डॉ. नीलम गोºहे, विधान परिषदेच्या उपसभापती
.......
अद्याप पुण्यातील कुठल्याही जागेवर निर्णय झालेला नाही. यापूर्वी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुण्यातील जागा लढविण्यासंबंधी चर्चा केली आहे. त्यातून किमान दोन जागा तरी देण्यात याव्यात अशी मागणी आहे. ते ठरवतील त्यानुसार आम्ही पक्षाचे काम करणार आहोत. त्यांचा आदेश अंतिम असेल. - संजय मोरे, शहर प्रमुख, शिवसेना