कुलगुरू महाेदय, आम्हाला शिकायचंय...! विद्यार्थ्यांची आर्त विनवणी; वसतिगृह देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:18 IST2025-08-26T15:17:17+5:302025-08-26T15:18:09+5:30
- गावातून येथपर्यंत पाेहाेचण्यासाठी त्यांना करावा लागलेला त्यांचा संघर्ष ऐकताना अंगावर काटा येत हाेता, तेव्हा विद्यापीठ न्याय देणार का ? ही मुले शिक्षण पूर्ण करू शकणार का ? हा खरा प्रश्न आहे.

कुलगुरू महाेदय, आम्हाला शिकायचंय...! विद्यार्थ्यांची आर्त विनवणी; वसतिगृह देण्याची मागणी
पुणे : आम्हाला शिकायचं आहे, पण राहायची साेय हाेईना. त्यामुळे कुलगुरू महाेदय आम्हाला वसतिगृह द्या, अशी आर्त हाक देत विद्यापीठातील विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमाेर आंदाेलन करत हाेते. वसतिगृह न मिळाल्याने त्यांच्या संपर्कातील जवळपास दहा विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द करून गावचा रस्ता धरला आहे.
वर्ग सुरू हाेऊन महिना झाला, तसेच महिनाभरावर परीक्षा येऊन ठेपली आहे तरी आम्हाला राहायला जागा नाही. वेळीच वसतिगृह मिळाले नाही तर आमच्यावरही विद्यापीठ साेडण्याची वेळ येणार आहे, असे ते सांगत हाेते. गावातून येथपर्यंत पाेहाेचण्यासाठी त्यांना करावा लागलेला त्यांचा संघर्ष ऐकताना अंगावर काटा येत हाेता, तेव्हा विद्यापीठ न्याय देणार का ? ही मुले शिक्षण पूर्ण करू शकणार का ? हा खरा प्रश्न आहे.
एक-एक करून प्रत्येक जण आपले म्हणणे मांडत हाेता. सुरुवात मुलींनीच केली. मी नम्रता गायकवाड मूळची नांदेडची. अधिकारी हाेऊन समाजाचे प्रश्न साेडवण्याचे स्वप्न घेऊन मी पुण्यात आले. शिक्षण विभागात प्रवेश घेतला असून, गुणही चांगले आहेत. मला वेळीच वसतिगृह मिळाले तर पदव्युत्तर पदवी चांगल्या गुणाने पास हाेईनच, त्याचबराेबर अधिकारी हाेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करीन.
मी अभिषेक शेलकर. मूळचा बीडचा. राज्यशास्र विभागात मी एम.ए करत आहे. माझे वडील शेतकरी आहेत. त्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असून, बाहेर रूम करून राहणे मला परवडणारे नाही. हा प्रश्न केवळ माझ्यापुरता नाही, तर माझ्यासारखे गाव खेड्यातून आलेले अनेक विद्यार्थी या प्रश्नाने त्रस्त आहेत. माेठ्या कष्टाने इथपर्यंत आलेलाे आहाेत. तेव्हा विद्यापीठ साेडून गावी परत जाणे हा पर्याय हाेऊ शकत नाही. त्यामुळे न्याय, हक्कासाठी आम्ही आंदाेलन करत आहाेत.
मी ऋषिकेश काटुळे. मूळचा आंबेजोगाईचा. वडिलांचे छत्र हरपल्याने सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे; पण शिक्षण थांबवून राेजगार करत बसलाे तर शिक्षणापासून वंचित राहीन. मला ते हाेऊ द्यायचे नाही. म्हणून मी तात्पुरता डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करून पाेटाची खळगी भरत आहे. मला वसतिगृह मिळाले नाही तर शिक्षण इथेच थांबेल. विद्यापीठाला विनंती आहे की, त्यांनी मला आणि सहकाऱ्यांना वसतिगृह देऊन शिक्षण पूर्ण करण्याची संधी द्यावी.
मी सुषमा जाधव. मूळची धाराशिवची. मानववंशशास्त्र विभागात प्रवेश घेतला आहे. वडील शेतकरी असल्याने आर्थिक स्थिती फार चांगली नाही. गेस्ट म्हणून वसतिगृहात प्रवेश मिळाला, पण माझ्या मैत्रिणीला वसतिगृह मिळाले नाही. विद्यापीठ साेडण्याची वेळ तिच्यावर आली आहे. वसतिगृहात प्रवेश देण्याऐवजी विभागातील प्रवेश रद्द करण्याची धमकी दिली जात आहे, असे दीपाली साेळुंखे हिने सांगितले. इंग्रजी विषयात एमए करण्यासाठी साेलापूरहून पुण्यात आलेली संध्या पवार ही देखील सामान्य कुटुंबातील. तिचे वडील कंपनीत कामाला आहेत. बाहेर राहून मुलीला शिक्षण घेता येईल, इतकी त्यांची आर्थिक स्थिती नाही. हीच स्थिती जळगाव येथून आलेल्या अरविंद इंगळे याची आहे. राज्यशास्र विभागाचा ताे विद्यार्थी आहे.
...अशीही टाेलवाटाेलवी
विद्यापीठातील सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली गेली; पण यातील प्रक्रियेबाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याने विभागप्रमुख आणि वसतिगृह प्रमुख यांच्यात विद्यार्थ्यांचा चेंडू हाेत आहे. याबाबत राज्यशास्त्र विभागाच्या काही विद्यार्थ्यांनी तर चक्क सर्व्हे करून ताे अभ्यासपूर्ण मांडला आहे. त्यात जवळपास २०० विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरून सहभाग नोंदवला. त्यानुसार बहुसंख्य एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळालेले नाही. तसेच अनेक मुलींना वंचित ठेवण्यात आले आहे. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळावे म्हणून आम्हाला आंदाेलन करावं लागत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या काेणत्याही विद्यार्थ्याला राहायला साेय झाली नाही म्हणून शिक्षण साेडावे लागेल, असे हाेऊ नये म्हणून आम्ही सर्व प्रयत्नशील आहाेत. यात सर्वांना सामावून घेताना अडचणी येत आहेत; पण त्यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगेन की, वसतिगृहाचा प्रश्न सुटला नाही म्हणून लगेच प्रवेश रद्द करू नका. दहा नंबरचे वसतिगृह देखील सुरू केले आहे. लवकरच सर्वांना सामावून घेतले जाईल. मुलींना मी खास करून सांगेन की, वसतिगृहाची साेय झाली नाही म्हणून विद्यापीठ साेडावं लागणार नाही. त्यांना सामावून घेतलं जाईल. त्यामुळे विद्यार्थिनींनी विद्यापीठ साेडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी फक्त एकदा मला भेटावे. - डाॅ. सुरेश गाेसावी, कुलगुरू