गणेशोत्सवानंतर वेध नवरात्राचे! घटस्थापना ते विजयादशमी 'असे' आहेत मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 09:45 AM2023-10-13T09:45:46+5:302023-10-13T09:46:12+5:30

हा नवरात्र उत्सव अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला आहे...

Vedha Navratri after Ganeshotsav! Ghatasthapana to Vijayadashami are 'such' muhurtas | गणेशोत्सवानंतर वेध नवरात्राचे! घटस्थापना ते विजयादशमी 'असे' आहेत मुहूर्त

गणेशोत्सवानंतर वेध नवरात्राचे! घटस्थापना ते विजयादशमी 'असे' आहेत मुहूर्त

पुणे : गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते नवरात्राचे. हा नवरात्र उत्सव अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या वर्षीचा नवरात्र उत्सव दि. १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत रंगणार आहे. रविवारी घटस्थापना होत असून नवरात्रारंभ होत आहे. त्या दिवशी चित्रा नक्षत्र, वैधृती योग असला तरी हे कर्म तिथी प्रधान असल्याने रविवारी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे सुमारे पहाटे ५ पासून दुपारी १.४५ पर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल, असे दाते पंचांगाचे मोहन दाते यांनी सांगितले.

दि. १९ रोजी ललिता पंचमी असून दि. २१ रोजी महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. दि. २२ रोजी महाष्टमीचा उपवास करावयाचा असून दि. २३ ऑक्टोबर रोजी सोमवारी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ती) आहे. सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एका दिवशी येतात, मात्र या वेळेस दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवरात्रोत्थापन आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत ९ दिवस किंवा १० दिवसांचा कालावधी असतो. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे असा फरक असतो, पण या वर्षी घटस्थापनेपासून ९ व्या दिवशी नवरात्रोत्थापना असून दसरा १० व्या दिवशी आहे. अशौचमुळे किंवा इतर काही अडचणींमुळे ज्यांना १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी अशौच संपल्यावर १७ ऑक्टोबर, १९ ऑक्टोबर, २१ ऑक्टोबर किंवा २२ ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व २३ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन करावे.

महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी २१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते. त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे. मात्र दुर्गाष्टमी २२ ऑक्टोबर रोजी आहे. विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे २४ ऑक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २.१८ ते ३.०४ या दरम्यान आहे.

मुहूर्त व दिनांक

१५ ऑक्टोबर – घटस्थापना

१९ ऑक्टोबर – ललिता पंचमी

२१ ऑक्टोबर – महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे)

२२ ऑक्टोबर – दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास

२३ ऑक्टोबर – नवरात्रोत्थापना

२४ ऑक्टोबर – विजया दशमी (दसरा)

Web Title: Vedha Navratri after Ganeshotsav! Ghatasthapana to Vijayadashami are 'such' muhurtas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.