पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा याेजना विभागाने सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून नाशिक येथे हाेणाऱ्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी हाेण्याचे आवाहन केले आहे. सदर पत्र व्हायरल हाेताच सर्व स्तरातून विराेध सुरू झाला. एनएसयूआय यासह विविध संघटनांनी एकत्र येत मंगळवारी (दि. १२) राष्ट्रीय सेवा याेजनेच्या कार्यालयाबाहेर आंदाेलन केले. त्याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने सदर पत्र माघारी घेत असल्याचे जाहीर केले.
‘शिक्षण वाचवा, विद्यापीठ वाचवा, लोकशाही वाचवा’ अशी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी प्रशासनाला जाब विचारला. व्यक्तिपूजा हाेईल, असा विषय घेतला जाताे आणि त्यावर काहीच आक्षेप न घेता विद्यापीठ मदत करतं, हे आक्षेपार्ह आहे. तरीही विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा याेजनेच्या स्वयंसेवकांना या स्पर्धेबाबत माहिती देऊन जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होण्यासाठी सूचित करण्यावर आक्षेप आहे, अशी भूमिका आंदोलक विद्यार्थी नितीन आंधळे, राहुल ससाणे, अक्षय कांबळे, सिद्धांत जांभूळकर यांनी मांडली हाेती.
यावर राष्ट्रीय सेवा याेजना विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद भोसले यांनी स्पष्ट केले की, 'व्हॉइस ऑफ देवेंद्र' स्पर्धेचा विद्यापीठाशी थेट संबंध नाही. "काही सामाजिक संस्थांनी आम्हाला पत्र देऊन ही स्पर्धा आयोजित करण्याची विनंती केली होती. यापूर्वीही अशा स्पर्धा झाल्या. तरीही संबंधित पत्र रद्द करत आहाेत, असे विद्यापीठाने स्पष्ट केले. तसेच संकेतस्थळावरून ते काढून टाकले आहे.