Unseasonal rain: १ लाख १९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, पंचनामे सुरू, सर्वाधिक फटका नाशिकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 10:48 IST2026-04-02T10:48:00+5:302026-04-02T10:48:33+5:30

पुढील दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Unseasonal rain Crops damaged on 1 lakh 19 thousand hectares, Panchnama assessment begins, Nashik worst hit | Unseasonal rain: १ लाख १९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, पंचनामे सुरू, सर्वाधिक फटका नाशिकला

Unseasonal rain: १ लाख १९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, पंचनामे सुरू, सर्वाधिक फटका नाशिकला

पुणे : राज्यात मार्च महिन्यात झालेला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे २८ जिल्ह्यांतील तब्बल सव्वा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील काढणीला आलेल्या रब्बी तसेच भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात सुमारे ३० हजार हेक्टरवर झाले आहे. कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून, याबाबतचा अहवाल लवकरच राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

राज्यात १६ ते १९ तसेच २६ ते ३१ मार्चपर्यंत अवकाळी तसेच गारपिटीचा तडाखा बसला. या पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी या महत्त्वाच्या रब्बी पिकांसह कांदा, मका, भाजीपाला, डाळिंब, केळी, पपई, संत्रा, मोसंबी, आंबा, भुईमूग, कलिंगड, पेरू, बाजरी, तीळ यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. कृषी विभागाने केलेल्या नजरअंदाज अहवालानुसार राज्यात आतापर्यंत १ लाख १९ हजार ३७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

यात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात २९ हजार ८११ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. त्याखालोखाल नुकसान अहिल्यानगर जिल्ह्यात २३ हजार ६३२, जळगाव जिल्ह्यात २० हजार ६१३, धुळे जिल्ह्यात १४ हजार ८३१, बुलढाणा जिल्ह्यात ८ हजार ५०७, संभाजीनगर जिल्ह्यात ८ हजार ४४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसदेखील राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पिकांचे आणखी नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी सुरू केली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

---------

जिल्हानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)

कोल्हापूर १५.९०

सातारा १५०.१०

सांगली १८६५.४२

नागपूर ४१.१७

भंडारा ९८.३०

चंद्रपूर १९८.३०

गोंदिया ३२.५०

गडचिरोली ३५७.१५

लातूर २०३.१०

नांदेड ५०२.३२

धाराशिव १४०७.४०

अमरावती ६९५.८६

अकोला ९३०.६४

वाशिम १२०.१०

बुलढाणा ८५०७.१५

यवतमाळ १९०.९०

पुणे १७८५.४०

सोलापूर २४३९.०५

अहिल्यानगर २३६३२.९०

नाशिक २९८११.७०

धुळे १४८३१.५०

नंदूरबार २९१.७६

जळगाव २०६३१

संभाजीनगर ८४४५.१०

जालना १६९२

बीड ४५२.८०

रत्नागिरी ६०.०२

सिंधुदुर्ग १.५३

एकूण ११९३७३.०७

Web Title : महाराष्ट्र में फसल नुकसान: एक लाख हेक्टेयर से अधिक प्रभावित, नासिक सबसे अधिक प्रभावित

Web Summary : महाराष्ट्र के 28 जिलों में बेमौसम बारिश और ओलावृष्टि से फसलों को नुकसान हुआ, जिससे 1.19 लाख हेक्टेयर से अधिक क्षेत्र प्रभावित हुआ। नासिक सबसे ज्यादा प्रभावित जिला है, जहां लगभग 30,000 हेक्टेयर प्रभावित है। और बारिश की आशंका है, जिससे किसानों की चिंता बढ़ गई है।

Web Title : Crop Damage in Maharashtra: Lakh Hectares Affected, Nashik Hit Hardest

Web Summary : Unseasonal rains and hailstorms damaged crops across 28 districts of Maharashtra, impacting over 1.19 lakh hectares. Nashik is the worst-hit district, with nearly 30,000 hectares affected. More rain is expected, adding to farmers' worries.