केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 17:39 IST2025-07-23T17:38:03+5:302025-07-23T17:39:41+5:30

येत्या १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या १०५ व्या पुण्यतिथी दिनी होणार पुरस्कार वितरण

Union Minister Nitin Gadkari awarded Lokmanya Tilak National Award | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची १०५ वी पुण्यतिथी दिनी सकाळी १०:३० वाजता टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या सोहळ्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण होईल. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप आहे.

टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी बुधवारी (दि. २३) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान देऊन गौरविलेल्या आजवरच्या पुरस्कारार्थींच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा इंग्रजी ग्रंथ तयार करण्यात आला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होईल. रस्ते हे विकासाचे साधन आहे, हे ओळखून नितीन गडकरी यांनी देशभर महामार्गांचे जाळे उभारले. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या प्रारूपातून त्यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नमामी गंगा प्रकल्पाला त्यांच्याच प्रयत्नाने लोकचळवळीचे स्वरूप आले. लोकमान्यांच्या चतु:सूत्रीतील स्वदेशीचा स्वीकार करत रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी गडकरी कार्यरत आहेत.

विविध प्रकारच्या वाहन निर्मितीत स्वदेशीचा पुरस्कार व प्रसार त्यांच्याकडून होत आहे. देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची २०२५ च्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पारदर्शी कारभार, जलद निर्णय प्रक्रिया, निर्णयाची कुशलतेने अंमलबजावणी ही गडकरींची वैशिष्ट्ये होत, असेही डॉ. रोहित टिळक यांनी नमूद केले.

Web Title: Union Minister Nitin Gadkari awarded Lokmanya Tilak National Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.