अंगावर वीज पडून आदिवासी कुटुंबातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 19:28 IST2024-06-05T19:27:21+5:302024-06-05T19:28:37+5:30

घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाने तरुणाच्या कुटूंबाला नुकसानभरपाई द्यावी, नागरिकांची मागणी

Unfortunate death of youth from tribal family due to lightning strike; Incidents in Khed Taluka | अंगावर वीज पडून आदिवासी कुटुंबातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; खेड तालुक्यातील घटना

अंगावर वीज पडून आदिवासी कुटुंबातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; खेड तालुक्यातील घटना

आळंदी : आळंदीलगत चऱ्होली खुर्द (ता. खेड) हद्दीतील वडगाव - आळंदी रस्त्यावरील ठाकरवाडी येथे अंगावर वीज पडून आदिवासी कुटूंबातील एका १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वीज पडून जीवितहानी होण्याची ही दोन दिवसात खेड तालुक्यातील ही दुसरी घटना आहे.
                 
बुधवारी (दि.५) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ओंकार मारुती ठाकर (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. आळंदी परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाचे वातावरण तयार झाले. मात्र पावसाच्या तुलनेत विजांचा कडकडाट जास्त प्रमाणात होता. दरम्यान कामावरून दुचाकीने घरी येत असताना ओंकारच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये ओंकारच्या शरीराला इजा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. 
            
पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह आळंदी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. ओंकारच्या घरची परिस्थिती हलाखीची असून कष्ट करून उदरनिर्वाह केला जात आहे. त्यामुळे शासनाने ओंकारच्या कुटूंबाला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.  दरम्यान या घटनेने आळंदीसह परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Unfortunate death of youth from tribal family due to lightning strike; Incidents in Khed Taluka