नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली अन् पाकिस्तानचा जळफळाट - चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 13:37 IST2022-12-18T13:37:05+5:302022-12-18T13:37:12+5:30
जगाच्या व्यासपीठावर भारताबद्दल काहीच करता येत नसल्याने पाकिस्तान अस्वस्थ

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली अन् पाकिस्तानचा जळफळाट - चंद्रशेखर बावनकुळे
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली व सामर्थ्यशाली होत आहे. त्यामुळे जगाच्या व्यासपीठावर भारताबद्दल काहीच करता येत नसल्याने पाकिस्तान अस्वस्थ आहे. त्यामधूनच पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी केळकर चौकात पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध व्यक्त केला. बावनकुळे यांच्यासह आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे तसेच प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक व भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, राज्यात १२०० ठिकाणी एकाचवेळी हे आंदोलन होत आहे. हताश झालेल्या पाकिस्तानला जगात काहीच किंमत राहिलेली नाही. मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचीच ही कमाल आहे. काहीच करता येत नसलेल्या पाकिस्तानी नेत्यांना आता मोदींवर टीका करण्याशिवाय पर्यायच नाही.
मुंबईतील महाविकास आघाडीच्या मोर्चावरही बावनकुळे यांनी टीका केली. राज्यातील नव्या सरकारने विकासाची बुलेट ट्रेन सुरू केली आहे. यातून आपले राजकीय अस्तित्वच धोक्यात येईल याची भीती वाटून महाविकास आघाडीने हा मोर्चा काढला. त्यांच्याच नेत्यांनी महापुरुषांचा वारंवार अपमान केला आहे, असे ते म्हणाले.