उमेद जागवली, पुणे जिल्ह्यामध्ये सव्वा लाख महिला लखपती दीदी; काय आहे उमेद अभियान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 10:40 IST2026-01-31T10:40:10+5:302026-01-31T10:40:55+5:30
पुणे जिल्ह्यात २०१९ पासून उमेद अभियान सुरू झाले असून सध्या जिल्ह्यात २६ हजार ६३६ महिला बचत गट आहेत

उमेद जागवली, पुणे जिल्ह्यामध्ये सव्वा लाख महिला लखपती दीदी; काय आहे उमेद अभियान?
पुणे: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत सातारा जिल्ह्यात महिला बचत गटांची चळवळ वेगाने वाढत असून बँकांच्या माध्यमातून कर्जपुरवठाही करण्यात येत आहे. यामुळे महिला स्वावलंबी होत असून विविध उत्पादने घेऊन त्याची विक्रीही करत आहेत. तसेच जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये एक लाख २३ हजार ७८५ महिला लखपती दीदी झाल्या होत्या, तर चालू वर्षात दोन लाख २७ हजार २३५ महिला लखपती दीदी बनविण्याचे उद्दिष्ट असून एक लाख १५ हजार १२० लखपती झाल्या आहेत. यात जिल्हा परिषदेचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत.
२६६३६ महिला बचत गट.....
पुणे जिल्ह्यात २०१९ पासून उमेद अभियान सुरू झाले आहे. सध्या जिल्ह्यात २६ हजार ६३६ महिला बचत गट आहेत. या गटात किमान १० महिला आहेत. त्यामुळे दोन लाख ९२ हजार ६५५ महिलांचे संघटन या बचत गटाद्वारे झालेले आहे.
काय आहे उमेद अभियान?
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियान हे राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून चालविले जाते. ग्रामीण भागातील महिला काही विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी बचत गटाद्वारे एकत्र येतात. अशा महिलांना शासनाकडून पाठबळ दिले जाते. उद्योग, व्यवसायासाठी बँकांच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात येतो.
दोन लाख २७ हजार २३५ चे उद्दिष्ट...
जिल्ह्याला २०२४-२५ वर्षात एक लाख २१ हजार २१६ लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. हे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झालेले आहे. तसेच चालू वर्षात दोन लाख २७ हजार २३५ चे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी एक लाख १५ हजार १२० महिला लखपती झालेल्या आहेत. अजूनही महिलांना लखपती दीदी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
लखपती दीदी म्हणजे काय?
संबंधित महिला किमान दोन व्यवसाय करत असावी. या व्यवसायातून वर्षाला किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळायला हवे. यासाठी उमेदअंतर्गत प्रशिक्षणे, मार्केटिंग सुविधा पुरविण्यात येते. तसेच मालाच्या विक्रीसाठी प्रदर्शने भरविली जातात.
तालुकानिहाय बचत गटांची संख्या
आंबेगाव २१५२
बारामती २२१६
भोर १९०५
दौंड २१८८
हवेली २७११
इंदापूर २७१४
जुन्नर २७८१
खेड २३८४
मावळ १७८१
मुळशी १२७८
पुरंदर १४६२
शिरुर २४२५
वेल्हे ६३९