Ujani Dam: अखेर १०० टक्के भरलं; दौंड मधून १२ हजार क्युसेकनं विसर्ग सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 14:57 IST2021-10-10T14:56:55+5:302021-10-10T14:57:38+5:30
राज्यातील दोन नंबरचा जलाशय साठा असलेले उजनी धरण (ujani dam) शंभर टक्के भरल्यामुळे दौंड येथून १२ हजार क्युसेकने विसर्ग येत असल्याने रविवारी (सकाळी ८)वाजल्यापासून धरणाच्या १६ गेटमधून २० हजार क्युसेक पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

Ujani Dam: अखेर १०० टक्के भरलं; दौंड मधून १२ हजार क्युसेकनं विसर्ग सुरु
कळस : राज्यातील दोन नंबरचा जलाशय साठा असलेले उजनी धरण शंभर टक्के भरल्यामुळे दौंड येथून १२ हजार क्युसेकने विसर्ग येत असल्याने रविवारी (सकाळी ८) वाजल्यापासून धरणाच्या १६ गेटमधून २० हजार क्युसेक पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील जायकवाडी (jayakwadi dam) नंतर सर्वात मोठी उजनी धरणाची जलाशय क्षमता आहे. १२३ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात सध्या १२२.४२ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला असून धरण १०९.६८ टक्के भरले आहे. धरणातील उपयुक्त साठाही ५८.७६ टीएमसी (tmc) झाला आहे. दौंड येथून १२२०९ क्युसेक्स विसर्ग चालू आहे.
उजनीचे १६ दरवाजे उघडण्यात आले असून २० हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तसेच रविवारी सकाळी १२ वाजता धरणाच्या दहिगांव कालव्यातून ६३ क्युसेक तर मुख्य कालवा १५० क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. धरण पूर्ण क्षमतेत आल्याने व दौंड येथून येणारा विसर्ग वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी-जास्त होईल त्याप्रमाणे निर्णय होईल असे उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने सांगितले. तसेच नदी काठावरील लोकांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.