नगररोडवर यू-टर्न म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर..! नगररोडवर पोलिस आणि मनपाचा प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:11 IST2025-10-09T10:56:24+5:302025-10-09T11:11:00+5:30
लोकांना सोय व्हावी म्हणून नव्हे, तर त्रास व्हावा म्हणूनच प्रशासन काम करते आहे की काय? असे चित्र सध्या नगररस्त्यावरील वाहतूक कोंडीचे चित्र दिसत आहे

नगररोडवर यू-टर्न म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर..! नगररोडवर पोलिस आणि मनपाचा प्रयोग
चंदननगर : येरवडा ते वाघोलीदरम्यानचा नगररोड हा मार्ग आता रस्ता नव्हे, तर वाहनचालाकांसह पादचाऱ्यांनाही दैनंदिन शिक्षा बनला आहे. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या नावाखाली वाहतूक विभाग आणि पुणे महानगरपालिकेने केलेले यू-टर्न आणि चौक बंदीचे प्रयोग नागरिकांसाठी रोगापेक्षा इलाज भयंकर ठरत आहेत.
लोकांना सोय व्हावी म्हणून नव्हे, तर त्रास व्हावा म्हणूनच प्रशासन काम करते आहे की काय? असे चित्र सध्या नगररस्त्यावरील वाहतूक कोंडीचे चित्र दिसत आहे. शास्त्रीनगर, रामवाडी, फिनिक्स, सोमनाथनगर फाटा, टाटा गार्डन, चंदननगर, बायपास, दर्गा या सर्व चौकांना बंद करून पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर ‘यू-टर्न’चा प्रयोग राबवला. मात्र, हा प्रयोग म्हणजे नागरिकांवर लादलेला शाप ठरला आहे.
प्रत्येक यू-टर्न हा अपघाताचे आमंत्रण देणारा आहे. ना दिशादर्शक फलक, ना सिग्नल, ना गती मर्यादा. प्रशासनाने ठिकठिकाणी बॅरिकेड्स ठेवले आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना दोन ते तीन किलोमीटर लांब जाऊन वळसा मारावा लागतो. पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडण्याची कुठेही सोय नाही. घरासमोर रस्ता दिसतो; पण पार करण्यासाठी दीड-दोन किलोमीटर फिरावं लागतं. ही कसली वाहतूक सुधारणा? ही तर नागरिकांच्या सहनशक्तीची थट्टा!
यू-टर्न धोकादायक बनवले आहेत. रस्त्यात खड्डे, चिखल, अनियंत्रित वाहनांची गर्दी ही स्थिती पोलिसांना दिसत कशी नाही असा सवाल नागरिक विचारत आतहे. वाहतूक विभागाने या सगळ्याला डोळेझाक करून चौकात जणू दंडवसुलीचे ठाणे उभारले आहेत. दिवस-रात्र पोलिस वाहनचालकांच्या पावत्या फाडण्यात गुंतले आहेत; पण वाहतूक नियंत्रण मात्र शून्य! खराडी, वडगावशेरी, चंदननगर, खुळेवाडी, पठारे ठुबेनगर, श्रीराम सोसायटी, तुळजाभवानीनगर या भागातील रहिवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. व्यापाऱ्यांचा व्यवसाय घटला, प्रवासाचा वेळ दुप्पट झाला आणि पादचाऱ्यांचे जीव रोज धोक्यात येतात. तरीही वाहतूक विभाग आणि मनपा दोघेही गप्प
पंधरा दिवसांचा प्रयोग सहाव्या महिन्यातही सुरूच
सहा महिने झाले ‘पंधरा दिवसांच्या प्रयोगाला’ आणि आजही स्थिती दिवसेंदिवस वाईटच होत आहे. रस्त्यांच्या नावाखाली, योजनांच्या नावाखाली केवळ नागरिकांना त्रास दिला जातो आहे. यू-टर्नवरील धोकादायक वळणे म्हणजे अपघातासाठीचे सापळे झाले आहेत. अनेक ठिकाणी रात्री अंधार, फलक नाहीत, सिग्नल नाहीत, त्यामुळे जीवघेणे प्रसंग ओढवतात.
मी आंदोलन करणार होतो. मात्र, पोलिसांनी पंधरा दिवसांत सर्व उपाययोजना करू, असे सांगितले. मात्र काहीच केले नाही. यू-टर्नवर गोंधाळासारखी स्थिती आहे. नगररोडाचा प्रवास असुरक्षित झाला असून स्थानिक व नगरोडवरून प्रवास करणारे नागरिक दररोज जीव टांगणीला टाकून प्रवास करतात. हे पोलिस व मनपाला दिसतच नाही. त्यामुळे आता आंदोलन करणार आहे. - आशिष माने, अध्यक्ष, वडगावशेरी विकास मंच
वाहतूक विभागाच्या सूचनांप्रमाणे आम्ही नगररोडच्या यू-टर्नवर उपाययोजना करत आहे. सर्व धोकादायक यू-टर्नची पाहणी करून ते सुरक्षित करण्याचे काम टप्प्याटप्प्यात सुरू आहे. -संजय धारव, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, पुणे मनपा