मंदिरांच्या दानपेट्या फोडणाऱ्या दोन चोरट्यांना अटक; जुन्नर-आंबेगावातील आठ मंदिरांतील चोरी उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:03 IST2026-03-13T17:02:53+5:302026-03-13T17:03:30+5:30
- पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

मंदिरांच्या दानपेट्या फोडणाऱ्या दोन चोरट्यांना अटक; जुन्नर-आंबेगावातील आठ मंदिरांतील चोरी उघड
नारायणगाव : मंदिरांच्या दानपेट्या फोडून रोख रक्कम व मौल्यवान साहित्य चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे. या आरोपींकडून १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांनी जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील आठ मंदिरांमध्ये चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
या प्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आळे गावातील श्री खंडोबा मंदिरात २३ फेब्रुवारी रोजी रात्री दोन अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचा मुलामा असलेले दागिने असा सुमारे २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
मागील दोन महिन्यांत जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील आळे येथील श्री खंडोबा मंदिर, शिरोली बु. येथील श्री भैरवनाथ मंदिर, नारायणगाव येथील श्री साईबाबा मंदिर, नळवणे येथील श्री खंडोबा मंदिर, मंचरजवळील कळंबा माता मंदिर, जुन्नर घालेवाडी येथील श्री शिवशंभू मंदिर तसेच रांजणगाव गणपती परिसरातील श्री सोमेश्वर मंदिर अशा विविध मंदिरांमधील दानपेट्या फोडून चोरी करण्यात आली होती.
सध्या गावोगावी यात्रा-उत्सव सुरू असल्याने मंदिरांमध्ये चोरीच्या घटना वाढल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त होत होता. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्याकडे मंदिर चोरीचे गुन्हे उघड करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार पोलिस अधीक्षक गिल्ल यांनी पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक स्थापन केले. पथकाने घटनास्थळांची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्याची कार्यपद्धती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. सर्व घटनांमध्ये एकाच वर्णनाचे आरोपी दिसत असल्याचे निष्पन्न झाले.
३ मार्च रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सुनील सुरेश आगिवले (वय २०, रा. कळस खुर्द, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) आणि भिमा भाऊसाहेब गिन्हे (वय २६, रा. नांदूर शिंगोटे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर; मूळ रा. कोतूळ, ता. अकोले) यांना पुणे-नाशिक महामार्गावरील कांदळी फाटा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आळेफाटा, नारायणगाव, जुन्नर, मंचर, रांजणगाव तसेच संगमनेर परिसरात मंदिर चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, स्प्रे, रोख रक्कम तसेच चांदीच्या पादुका असा एकूण १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे (खेड विभाग) व धनंजय पाटील (जुन्नर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार तसेच पोलीस अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, राजू मोमीन, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, समाधान नाईकनवरे, सुजाता कदम आदींच्या पथकाने केली.