Pune Crime: तंत्रज्ञानाचा वापर करून देवस्थानच्या दानपेट्यांवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील मंदिरांना लक्ष करणाऱ्या दोन अट्टल चोरांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचे साहित्य आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
गुगल मॅपचा असा व्हायचा वापर
या चोरीचे सर्वात धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे हे चोरटे कोणत्याही मंदिराची रेकी करण्यासाठी प्रत्यक्ष न जाता गुगल मॅपचा आधार घेत होते. ग्रामीण भागातील दुर्गम किंवा एकांत स्थळी असलेली मंदिरे ते गुगल मॅपवर शोधायचे. त्यानंतर त्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, पळून जाण्यासाठी असलेले रस्ते यांचा नकाशावरून अभ्यास करून त्याचे स्क्रीनशॉट आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवायचे. पूर्ण नियोजन झाल्यावर मध्यरात्री हे चोरटे चोरी करायचे.
गेल्या दोन महिन्यांत ७ मंदिरांमध्ये चोरी
पुणे जिल्ह्यात सध्या यात्रा आणि उत्सवांचे दिवस सुरू आहेत. याचाच फायदा घेत या चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. ३० डिसेंबर रोजी जुन्नरच्या नळवणे गावातील खंडोबा मंदिरात चोरीचा प्रयत्न केला होता. मात्र सायरन वाजल्याने चोरटे पळाले. २३ जानेवारी रोजी शिरूरमधील सोमेश्वर मंदिराची दानपेटी फोडून २०,००० रुपयांची चोरी केली. ६ फेब्रुवारीच्या रात्री जुन्नरमधील भैरवनाथ आणि शिवशंभो मंदिरातून ४५,००० आणि ११,००० रुपये लंपास केले. २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी साय मंदिर आणि खंडोबा मंदिरातून हजारोंची रोकड चोरी केली. पुजाऱ्याच्या खोलीची कडी बाहेरून लावून त्यांनी हे कृत्य केले. ३ मार्च रोजी मंचरमधील कळंबादेवी मंदिरातून रोख रकमेसह चांदीच्या पादुका आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरला.
असा लागला छडा
वाढत्या चोऱ्यांमुळे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि सहाय्यक निरीक्षक महादेव शेलार यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरटे चेहऱ्याला कापड बांधून दुचाकीवरून संगमनेरच्या दिशेला जात असल्याचे दिसले. यावरून पोलिसांनी सुनील सुरेश आगीवले (२०) आणि भीमा भाऊसाहेब गिर्हे (२६) या दोघांना पुणे-नाशिक महामार्गावरील कांदळी फाटा येथून ताब्यात घेतले.
मोबाईलमध्ये सापडले अनेक मंदिरांचे स्क्रीनशॉट
पोलिसांनी जेव्हा आरोपींचे मोबाईल तपासले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांच्या मोबाईलमध्ये पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक मंदिरांचे गुगल मॅपवरील स्क्रीनशॉट सापडले. आरोपी सुनील आगीवले याच्यावर यापूर्वी पुण्याच्या चतु:शृंगी पोलीस ठाण्यात चंदनाची झाडे चोरी केल्याचे ४ गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून एक दुचाकी, स्क्रू ड्रायव्हर, कटर, स्प्रे, रोख रक्कम आणि चांदीच्या पादुका असा एकूण १.१९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Web Summary : Pune police arrested two thieves who used Google Maps to plan robberies at seven temples in Junnar and Ambegaon, stealing cash and valuables. The duo scouted locations online, then struck at night, bypassing traditional reconnaissance methods.
Web Summary : पुणे पुलिस ने गूगल मैप का उपयोग करके जुन्नर और आंबेगांव में सात मंदिरों में चोरी करने वाले दो चोरों को गिरफ्तार किया। आरोपियों ने ऑनलाइन मंदिरों की रेकी की और नकदी व कीमती सामान चुरा लिया।