Shirur: चुकीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:26 IST2025-05-19T13:25:46+5:302025-05-19T13:26:20+5:30
Pune Shirur Car Accident: डंपर चालवणाऱ्या चालकाने चुकीच्या दिशेने वाहन चालवून समोरून येणाऱ्या पिकअपला जोरदार धडक दिली, अपघात घडल्यानंतर डंपरचालक घटनास्थळावरून फरार झाला

Shirur: चुकीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरातील कोळपेवस्ती येथे शनिवारी (दि. १७) रात्री एका भरधाव डंपरने समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सागर संभाजी कोळपे (वय २८, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) आणि यश सुधाकर भिसे (वय १२, सध्या रा. मांडवगण फराटा, कोळपेवस्ती, ता. शिरूर, मूळ रा. खेडवाडी, ता. गेवराई, जि. बीड) यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनिल बिरा कोळपे (रा. मांडवगण फराटा, कोळपेवस्ती, ता. शिरूर) हे गंभीर जखमी झाले.
घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी (दि. १७) रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान मांडवगण फराटा परिसरात मांडवगण फराटा ते वडगाव रासाई रोडवर कोळपेवस्ती येथील रोहिदास थोरात यांच्या घराजवळ ही घटना घडली. भरधाव वेगाने डंपर चालवणाऱ्या चालकाने चुकीच्या दिशेने वाहन चालवून समोरून येणाऱ्या पिकअपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये पिकअपमधील सागर संभाजी कोळपे (वय २८) आणि यश सुधाकर भिसे (१२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला व अनिल बिरा कोळपे हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर डंपरचालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची फिर्याद दादा बाळासो कोळपे (३८, रा. मांडवगण फराटा, कोळपेवस्ती, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित घटनेचा तपास शिरूर पोलीस करीत आहेत.