खंडाळ्यातील एस वळणावर भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 14:51 IST2018-12-22T14:45:49+5:302018-12-22T14:51:47+5:30
खंडाळ्यातील एस वळणावरील भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. निलेश मानाजी भवर (32), लहुराज हणमंत चव्हाण (30) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

खंडाळ्यातील एस वळणावर भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू
शिरवळ - खंडाळा गावच्या हद्दीतील धोकादायक एस वळणावरील अपघाताची मालिका संपत नाही आहे. हे वळण काढण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू असतानाच आणि भूमीपूजनाच्या आदल्या दिवशीच या वळणावर दोन तरुणांना जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.
निलेश मानाजी भवर (32), लहुराज हणमंत चव्हाण (30) अशी अपघातातमृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबात अधिक माहिती अशी की, भवर आणि चव्हाण हे दोघे दुचाकीवरून सुरूरहून म्हावशी, ता. खंडाळा येथे निघाले होते. एस वळणावर पोहोचल्यानंतर पुढे निघालेल्या अज्ञात वाहनाला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. यात दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात झाल्याचे समजताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
दरम्यान, या एस वळणावर आत्तापर्यंत 76 जणांचा बळी गेला होता. त्यामुळे हे वळण काढण्यासाठी प्रशासनावर मोठा दबाव टाकण्यात आला होता. अखेर हे वळण काढण्याचा शासन पातळीवर निर्णय झाल्यानंतर त्याचे भूमिपूजन रविवार 23 रोजी होणार आहे. असे असताना या एस वळणाच्या भूमीपूजनाच्या आदल्या दिवशीच या वळणाने दोघांचे बळी घेतल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. शासनाने केवळ भूमीपूजन करून न थांबता तत्काळ एस वळण काढण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी यानिमित्ताने नागरिकांमधून होत आहे.