पुण्यात १९१ रुग्ण प्रकरणे प्रलंबित ठेवणारे दोन लिपिक पोलिस कर्मचारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 18:09 IST2020-08-06T18:08:32+5:302020-08-06T18:09:21+5:30
कर्तव्यात बेजबाबदार,बेफिकीर व हलगर्जीपणा केल्याचा ठपका

पुण्यात १९१ रुग्ण प्रकरणे प्रलंबित ठेवणारे दोन लिपिक पोलिस कर्मचारी निलंबित
पुणे : कोरोना संसर्गाच्या काळात पोलीस रस्त्यावर बंदोबस्त करीत असताना कार्यालयात बसून काम करणारे लिपिक मात्र आपल्या कर्तव्याबाबत बेजबाबदार, बेफिकीर व हलगर्जीपणा करत होते. १९१ पोलिसांची रुग्ण प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या दोघा लिपिकांना अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी निलंबित केले आहे.
वरिष्ठश्रेणी लिपिक सतीश मुरलीधर सातपुते आणि कनिष्ठश्रेणी लिपिक आकाश रामचंद्र शिंदे अशी त्यांची नावे आहेत.
लॉकडाऊनच्या काळात मोठी जोखीम पत्करुन पोलीस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर बंदोबस्ताचे काम करीत आहेत. अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी इतकी जोखीम घेऊन काम करीत असताना कार्यालयात काम करणारे लिपिक मात्र त्यांना नेमून दिलेले कामकाज करण्यामध्ये बेजबाबदार, बेफिकीर, सचोटी, कर्तव्यपारायणता, हलगर्जीपणा, उद्धटपणाचे गैरवर्तन करत होते. सातपुते यांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक पदाचे ६१ व पोलीस हवालदार पदाचे ५७ असे ११८ रुग्णनिवेदन प्रकरणे प्रलंबित ठेवलेली आहेत. आकाश शिंदे यांनी त्यांच्याकडे ७३ रुग्ण निवेदन प्रकरणे प्रलंबित ठेवलेली आहेत. आपल्याकडील काम प्रलंबित असतानाही ते ३ दिवस कोणालाही काही न कळविता गैरहजर राहिले. तसेच २३ जुलैपासून विनापरवाना गैरहजर राहिला. त्यामुळे प्राथमिक चौकशीमध्ये कसुरी आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.