ओतूरमध्ये अवैध वास्तव्य करणारे दोन बांगलादेशी नागरिक ताब्यात; एटीएसची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 20:32 IST2025-05-07T20:30:56+5:302025-05-07T20:32:40+5:30
पोलिसांनी या कारवाईत दोघांकडून बनावट भारतीय ओळखपत्रे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, व्हिसा जप्त केला आहे.

ओतूरमध्ये अवैध वास्तव्य करणारे दोन बांगलादेशी नागरिक ताब्यात; एटीएसची कारवाई
किरण शिंदे
ओतूर - ओतूर परिसरात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ताजमीर मोश्ताफा अन्सारी (वय २९) आणि मोहम्मद अलिमूल गुलाम अन्सारी (वय २८) अशी आहेत. हे दोघेही मूळचे बांगलादेशमधील बोकराई जिल्ह्यातील शारखीरा येथील रहिवासी असून, सध्या ओतूर येथे अवैधरित्या राहत होते.
एटीएसने ओतूर पोलीस स्टेशनच्या सहकार्याने प्रथम ताजमीर अन्सारीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर त्याचा साथीदार मोहम्मद अलिमूल अन्सारी यालाही अटक करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत दोघांकडून बनावट भारतीय ओळखपत्रे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच मोबाईल हँडसेट, बांगलादेशी पासपोर्ट (ज्याची मुदत संपलेली आहे) व व्हिसा जप्त केला आहे.
ही कारवाई एटीएसचे अधिकारी एपीआय दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल शरद जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल तांदळवाडे यांनी केली. या दोघांविरुद्ध विदेशी नागरिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत.