सत्यशोधक विवाह म्हणजे सामाजिक क्रांती; विवेक, समता अन् सुधारणांचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:17 IST2025-06-03T16:17:20+5:302025-06-03T16:17:41+5:30

'लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचा मिलाप नाही, तर दोन विचारधारांचा, समानतेचा आणि विश्वासाचा बंध आहे', हे सांगणारे आणि जगणारे अनेक तरुण आता सत्यशोधक विवाह पद्धतीकडे वळताना दिसत आहेत.

Truth-seeking marriage is a social revolution; the path to conscience, equality and reform | सत्यशोधक विवाह म्हणजे सामाजिक क्रांती; विवेक, समता अन् सुधारणांचा मार्ग

सत्यशोधक विवाह म्हणजे सामाजिक क्रांती; विवेक, समता अन् सुधारणांचा मार्ग

- उजमा शेख

पुणे :
सध्याच्या काळात विवाह सोहळे मोठ्या प्रमाणावर खर्च, दिखावा आणि जातीधर्माच्या बंधनात अडकलेले दिसतात. मात्र या पार्श्वभूमीवर 'सत्यशोधक विवाह' हे समाजात समतेचा, विज्ञाननिष्ठ विचाराचा आणि परिवर्तनाचा एक आदर्श विवाह म्हणून समोर येत आहे. 'लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचा मिलाप नाही, तर दोन विचारधारांचा, समानतेचा आणि विश्वासाचा बंध आहे', हे सांगणारे आणि जगणारे अनेक तरुण आता सत्यशोधक विवाह पद्धतीकडे वळताना दिसत आहेत. महात्मा जोतिराव फुले यांनी १९ व्या शतकात या सत्यशोधक विवाह पद्धतीची सुरुवात केली. यामध्ये ब्राह्मण पुजाऱ्यांशिवाय, धार्मिक विधींविना दोघा वधू-वरांनी समाजासमोर परस्पर संमतीने विवाह करणे हा मुख्य गाभा आहे.

अंधश्रद्धा, जातिभेद आणि अवास्तव खर्च टाळणारी ही विवाहपद्धत, समाजसुधारणेच्या दिशेने उचललेले एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या पद्धतीचा पाया घातला आणि स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्यांना बळ दिले. सत्यशोधक विवाहातून कोणताही धार्मिक विधी, मंत्रपठण, ब्राह्मण वर्चस्व किंवा हुंडा नसतो. वधू-वर एकमेकांच्या समोर उभे राहून, प्रेम, सहजीवन, जबाबदारी आणि महात्मा जोतिराव फुले यांनी तयार केलेल्या समतेच्या मंगलाष्टक म्हणतात.

हुंड्याला ठाम नकार

सत्यशोधक समाजाची लग्न परंपरा हा हूंडाविरोधी चळवळीचा मजबूत भाग ठरली आहे. या विवाहात हुंडा घेणे किंवा देणे पूर्णतः निषिद्ध आहे. दोन्ही कुटुंबांतही याचे पालन होत असल्याने अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक दडपणाविना लग्न लावणे शक्य होते.

सामाजिक बदलाचा भाग

सत्यशोधक विवाह केवळ विधी नाही, ती एक सामाजिक क्रांती आहे. या पद्धतीने विवाह करणारे जोडपे समाजात विचारप्रवृत्त चर्चा घडवून आणते. खर्च, दागदागिने, सजावट, वरात, जेवणावळी यांचा अतिरेक न करता, अत्यंत साध्या पद्धतीने विवाह होतो.

सत्यशोधक विवाहाच्या माध्यमातून अनेक जातीय आंतरजातीय विवाह लावण्यात येतात. सत्यशोधक विवाह केवळ विधी नाही. हा विवाह पुजारीविना, धार्मिक विधीविना अन् हुंडाविना पार पडतो. सत्यशोधक विवाह पद्धत सामूहिक पातळीवर झाली पाहिजे.  -  प्रा. प्रतिमा परदेशी, अध्यक्ष सत्यशोधक प्रबोधन महासभा  

Web Title: Truth-seeking marriage is a social revolution; the path to conscience, equality and reform