खेड शिवापूर: पुणे-सातारा महामार्गावरील वेळू (ता. भोर) हद्दीत बुधवारी (30 जुलै) सकाळी नऊच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला, तर पिकअप चालक गंभीर जखमी झाला. पुण्याहून सातारच्या दिशेने चाललेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक मुख्य रस्त्याच्या दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या वाहनांना धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये प्रथमेश महादेव रेडेकर (32, रा. सांगली) आणि दिव्यम सुनिल निकम (31, रा. धुळे) यांचा समावेश आहे. गंभीर जखमी पिकअप चालकाची ओळख संजय श्रीरंग खाटपे (42, रा. हिंगेवाठार, ता. भोर) अशी आहे.
सकाळी नऊच्या सुमारास पुण्याकडून सातार्याकडे जाणारा ट्रक (क्र. एमएच 04 केयू 1144) ससेवाडी उड्डाणपुलाचा उतार उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव ट्रकने रस्ता दुभाजक तोडून सातारा-पुणे मार्गावर जाऊन समोरून येणाऱ्या कंटेनरला (क्र. एचआर 55 एपी 3356) जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ट्रक पलटी झाला आणि बाजूने जाणाऱ्या पिकअप जीप (क्र. एमएच 12 जेएफ 5288) तसेच तीन दुचाकींना – केटीएम (क्र. एमएच 18 बीबी 3999), युनिकॉर्न (क्र. एमएच 10 डीएक्स 5694) व स्प्लेंडर (क्र. एमएच 12 एमवाय 1455) – धडक दिली. या अपघातात तिन्ही दुचाकीस्वार आणि पिकअप चालक गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिक व डब्ल्यूओएम कंपनीच्या रुग्णवाहीकेच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने भारती हॉस्पिटल, पुणे येथे हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच रेडेकर आणि निकम यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अपघातानंतर राजगड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. ट्रक चालक मेहताब दफेदार (रा. कोठावली, पश्चिम बंगाल) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस हवालदार सागर गायकवाड यांनी दिली.