ओतूर: अहिल्यानगर -कल्याण महामार्गावर ओतूर येथील अहीनवेवाडी फाट्याजवळ पुखराज हॉटेल समोर ट्रक आणि कारचा सामोरासमोर अपघात होऊन कार मधील ३ जण जखमी झाले आहेत. तर एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अधिक माहिती अशी की, अहिल्यानगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर शनिवार दि.२६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता कल्याणच्या दिशेने ट्रक येत होती. तर आळेफाटाच्या दिशेने ओरा कार चालली होती. या दोन्ही वाहनांची अहिनवेवाडी फाट्याजवळील पुखराज हॉटेल समोर समोरासमोर जोरदार धडक झाली. या घटनेत कार मधील तीन जण जखमी झाले तर एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. अपघात एवढा भयंकर होता की कारचा चक्का चूर झाला आहे. ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलिसांनी वाहने बाजूला करून रस्ता सुरळीत केला असल्याचे समजते.
अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर ट्रक आणि कारची समोरासमोर धडक; ३ जण जखमी, एका महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 18:18 IST