रुग्णांशी सौजन्याने वागा, कायद्याचे पालन करा; रुग्णालयांना पुणे महापालिकेच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 19:13 IST2025-05-12T19:12:57+5:302025-05-12T19:13:44+5:30
सर्व खासगी रुग्णालये व शुश्रुषागृहांनी रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने प्राथमिक जीवित रक्षणाचे उपचार देणे कायद्याने बंधनकारक आहे

रुग्णांशी सौजन्याने वागा, कायद्याचे पालन करा; रुग्णालयांना पुणे महापालिकेच्या सूचना
पुणे : शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांत रुग्णांबाबत घडलेल्या प्रकरणांची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी सर्व खासगी रुग्णालयांना रुग्णांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना केल्या आहेत. आरोग्य विभागाने पाठविलेल्या पत्रात शहरातील खासगी रुग्णालयांना ‘दी बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट’ व महाराष्ट्र शासन अधिसूचनेतील सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याची नव्याने जाणीव करून दिली आहे. विशेष करून शासनाच्या अधिसूचनेतील नियम नं. ११ मधील (जे) व (एल)चे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्व खासगी रुग्णालये व शुश्रुषागृहांनी रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने प्राथमिक जीवित रक्षणाचे उपचार देणे कायद्याने बंधनकारक आहे. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास आवश्यकतेनुसार न्यायवैद्यक प्रक्रिया पूर्ण करून नातंवाइकांकडे मृतदेह सुपूर्द करावा. कुठल्याही परिस्थितीत रुग्णालयांचे देयक भरले नाही म्हणून किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव मृतदेह रोखून ठेवता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना आरोग्यप्रमुखांनी दिल्या आहेत.
पूना हॉस्पिटलने तब्बल आठ तास मृतदेह अडवून ठेवल्याची माहिती समोर आली होती. एका कुटुंबाने महापालिकेककडे याबाबत तक्रार केली होती. महापालिकेने रुग्णालयाला समजही दिली होती. त्यानंतर असा प्रकार पुन्हा घडू नये. यासाठी सर्व खासगी रुग्णालयांना रुग्णांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत.