मिसिंग लिंक प्रकल्पामुळे पुणे-मुंबईदरम्यान प्रवासाचा अर्धा तास कमी होणार - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 13:26 IST2025-07-13T13:25:57+5:302025-07-13T13:26:30+5:30

फडणवीस म्हणाले, या प्रकल्पामुळे घाट असलेला भाग टाळता येणार असून, घाटमार्गामुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार

Travel time between Pune and Mumbai will be reduced by half an hour: Devendra Fadnavis | मिसिंग लिंक प्रकल्पामुळे पुणे-मुंबईदरम्यान प्रवासाचा अर्धा तास कमी होणार - देवेंद्र फडणवीस

मिसिंग लिंक प्रकल्पामुळे पुणे-मुंबईदरम्यान प्रवासाचा अर्धा तास कमी होणार - देवेंद्र फडणवीस

पुणे :पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पातील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून, या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार बाळा भेगडे, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सहव्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल, राजेश पाटील, मुख्य अभियंता राजेश निघोट, अधीक्षक अभियंता राहुल वसईकर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, या प्रकल्पामुळे घाट असलेला भाग टाळता येणार असून, घाटमार्गामुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर या मार्गावर आरामदायी प्रवास होणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण तीन बोगदे असून एक बोगदा ९ किलोमीटर लांब व २३ मीटर रुंदीचा असून, देशातल्या सर्वात जास्त लांबीचा बोगदा ठरणार आहे. या अगोदर समृद्धी महामार्गावरील बोगद्याचा विक्रम या बोगद्यामुळे मागे पडेल. प्रकल्पांतर्गत वर्षातील सर्वाधिक उंच पूल बांधण्यात येत असून, याची उंची १८५ मीटर आहे. हादेखील एक विक्रम होणार आहे. या प्रकल्पाचे एकूण ९४ टक्के काम पूर्ण झाले.

शिंदे म्हणाले, मिसिंग लिंक प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत असून, हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. या घाट भागातील वाहतुकीची समस्या पूर्णपणे सुटण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होणार आहे. महामार्गावरील या प्रकल्पामुळे वेळेसोबतच इंधनाचीही बचत होईल, प्रदूषणही कमी होईल.

Web Title: Travel time between Pune and Mumbai will be reduced by half an hour: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.