भाजीपाला खरेदी करण्याचा बहाणा करून हातभट्टी दारूची करायचे वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 16:00 IST2020-04-16T15:56:34+5:302020-04-16T16:00:42+5:30
मेथीच्या पेंड्याखाली दडवलेले गावठी दारूचे २० फुगे

भाजीपाला खरेदी करण्याचा बहाणा करून हातभट्टी दारूची करायचे वाहतूक
पुणे: एकीकडे कुठुनही दारू कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या व्यक्तींनी उच्छाद मांडला आहे. दुसरीकडे काही करून दारूची विक्री कशाप्रकारे करता येईल यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढविण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत भाजी खरेदी करण्याच्या बहाण्याने घराबाहेर बाहेर पडून हातभट्टी दारूची वाहतूक करून विक्री करणाऱ्या दोघांच्या विरुद्ध दत्तावाडी पोलीस ठाण्यात कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविंद्र सखाराम पारदुले (४२,), गितेश भरत खाणेकर (३१,रा. दोघेही जनता वसाहत) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
प्रतिबंधात्मक आदेशाच्या पार्श्वभूमीवर दत्तवाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ आपल्या पथकासह ल.रा. शिंदे चौक लक्ष्मीनगर पर्वती येथे नाकाबंदी करत होते. दरम्यान, दुपारी सव्वा तीनच्या सुमारास वाहनांची तपासणी करत असताना दोन व्यक्ती एका दचाकीवरून येताना दिसल्या. त्यांना थांबवून बाहेर पडण्याचे कारण विचारले तेव्हा ते दोघांनी भाजी खरेदी करण्यासाठी बाहेर गेल्याचे सांगितले. त्यांच्याकडे बाहेर पडण्याचा परवाना आहे का याची विचारणा केली त्यावेळी परवाना नसल्याचे समोर आले. मात्र दोघांच्याही हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांच्याकडील भाजीच्या पिशवीची तपासणी केली असता, मेथीच्या पेंड्याखाली गावठी दारूचे दडवलेले २० फुगे मिळून आले. दोघांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दारू विक्री करता आणली असल्याचे सांगितले. एक दुचाकी व दारूचे फुगे असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.