प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी तरुणाचा मृत्यू; सदनिकेत कीटकनाशक फवारणी केल्याने मृत्यू झाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 16:01 IST2025-10-25T16:00:07+5:302025-10-25T16:01:35+5:30
तरुण सदनिकेचा दरवाजा बंद करून झोपला होता, दुपारी मित्रांनी त्याला हाक मारली. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मित्रांनी सदनिकेचा दरवाजा तोडला. तेव्हा तो बेशुद्धावस्थेत पडला होता

प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी तरुणाचा मृत्यू; सदनिकेत कीटकनाशक फवारणी केल्याने मृत्यू झाल्याचा संशय
पुणे : सदनिकेत कीटकनाशक फवारणी केल्यानंतर प्रशिक्षणार्थीपोलिस कर्मचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवार पेठेतील श्री जोगेश्वरी मंदिरासमोरील एका सोसायटीतील सदनिकेत ही घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.
रवींद्र बबन जाधव (२६, रा. इंदापूर, जि. पुणे) असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. जाधव प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी असून, तो सध्या सोलापुरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होता. दिवाळीच्या सुटीत तो बुधवार पेठेतील श्री जोगेश्वरी मंदिरासमोर एका सोसायटीत राहणाऱ्या मित्राकडे आला होता. त्याचा मित्र सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. मंगळवारी तो सदनिकेत झोपला होता. त्याने सदनिकेचा दरवाजा बंद केला होता. दुपारी मित्रांनी त्याला हाक मारली. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मित्रांनी सदनिकेचा दरवाजा तोडला. तेव्हा तो बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याला लगेचच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीयतज्ज्ञांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
चौकशीत सदनिकेत कीटकनाशक फवारणी (पेस्ट कंट्रोल) केल्याची माहिती मिळाली. विषारी वायुमुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागचे कारण समजेल, अशी माहिती विश्रामबाग पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण घोडके यांनी दिली.