पुण्यातील ट्राफिकची समस्या अत्यंत जटिल; ठोस मार्गाशिवाय गत्यंतर नाही, अजित पवारांचे युद्धपातळीवर प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 13:48 IST2025-01-10T13:47:54+5:302025-01-10T13:48:58+5:30
वाहतूक समस्येची सोडवणूक करण्यासाठी काही ठिकाणी एकेरी मार्ग करण्यात येत आहेत

पुण्यातील ट्राफिकची समस्या अत्यंत जटिल; ठोस मार्गाशिवाय गत्यंतर नाही, अजित पवारांचे युद्धपातळीवर प्रयत्न
पुणे: पुण्यातील वाहतुकीची समस्या जटिल बनत असून, यावर ठाेस मार्ग काढल्याशिवाय गत्यंतर नाही. वाहतूक समस्येची सोडवणूक करण्यासाठी काही ठिकाणी एकेरी मार्ग करण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी ते यापूर्वीच केले आहेत. काही ठिकाणी पूल पाडून वने पूल करण्यात येत आहेत. यात केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेले प्रश्न केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून सोडविले जातील, राज्याशी संबंधित प्रश्न आम्ही राज्यकर्ते एकत्रित बसून सोडू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात विविध विकासकामासंदर्भात आयोजित आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
याबाबत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी या सर्वांची आणखी एक बैठक आयोजित केली जाईल. त्यात लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. दोन्ही महापालिकांमध्ये समन्वय ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता पीएमपीला २०० टाटांच्या बस खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संदर्भात पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भूसंपादनावरही ताेडगा
रिंगरोड संदर्भात राज्याच्या महसूल विभागाशी आणि जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांकडे काही प्रश्न प्रलंबित आहेत. त्या प्रश्नांसंदर्भात चर्चा घडत आली आहे, ते प्रश्न मार्ग लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेऊन रिंगरोडच्या भूमिपूजनाची तारीख लवकरच निश्चित करू, अशी माहितीही पवार यांनी दिली. भूसंपादनात काही भाग संपादित करण्याचा राहिला असून, यात काही इमारती जात आहेत, हा प्रश्न कसा निकाली काढायचा हे ठरवत आहोत यातून मार्ग काढून रिंगरोडचे काम लवकरच सुरू करू, असेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना आणि शिरूर येथील घोडगंगा सहकारी साखर कारखाने, हे दोन कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कारखान्याचे अध्यक्ष, संचालक सहकार आयुक्त तसेच राज्य सहकारी बँकेचे विद्याधर अनास्कर यांच्याशी चर्चा केली आहे. त्यात कोणताही राजकीय मतभेद राजकारणात हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आपला प्रयत्न राहील. कारखान्यांवरील कर्ज किती आहे, याची रक्कम काढण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ही रक्कम एकाचवेळी भरण्यासाठी याचा विचार करण्यात येईल. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या दोन्ही कारखान्यांचा प्रश्न निकाल काढून हे कारखाने सुरू करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुण्यामध्ये गुरुवारी सकाळपासून पुणे विद्यापीठ, सहकार विभाग सामाजिक न्याय विभाग, पुणे महापालिका, पिंपरी महापालिका, मेट्रो यांच्यासह वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि अन्य स्वयंसेवी संस्थांच्या बैठका घेतल्या. त्यात त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केला. दरम्यान, रात्री उशिरा पोलिसांचीसुद्धा बैठक घेतल्याचे सांगण्यात आले.