Video: सिंहगड रोडच्या नव्या उड्डाणपुलावर उदघाटनाच्या दुसऱ्या दिवशीच वाहतूककोंडी; ५ मिनिटाच्या अंतरासाठी अर्धा तास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:39 IST2025-05-03T16:25:08+5:302025-05-03T16:39:52+5:30
सिंहगड रोडवरील वाहतूककोंडी कमी होण्याच्या दृष्टीने हा उड्डाणपूल बांधण्यात आला होता, मात्र अजूनही परिस्थिती 'जैसे थे' च आहे

Video: सिंहगड रोडच्या नव्या उड्डाणपुलावर उदघाटनाच्या दुसऱ्या दिवशीच वाहतूककोंडी; ५ मिनिटाच्या अंतरासाठी अर्धा तास
पुणे: पुण्यातील सिंहगड रस्ता आणि वाहतूक कोंडी हे वर्षोनुवर्षाचं समीकरण आहे. याच वाहतूक कोंडीतूनपुणेकरांची सुटका करण्यासाठी सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फन टाईम सिनेमा पर्यंत नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला. मागील कित्येक महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला हा उड्डाणपूल अखेर पुणेकरांसाठी सुरू करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यात आले. या नवीन उड्डाणपुलाचं उदघाटन झाल्यानंतर अ दुसऱ्याच दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
सिंहगड रस्त्यावर नुकताच उद्घाटन झालेल्या उड्डाणपुलावर दुसरयाच दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली आहे. त्यामुळे उड्डाणपूल बांधण्याचा हेतू खरंच सफल झाला का? असा प्रश्न आता पुणेकरांना पडलाय. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी या उड्डाणपुलावर वाहनांच्या जवळपास एक किलोमीटरपर्यंत रांगाच रांगा पाहायला मिळाल्या आहेत. शहरातला सर्वांत मोठा उड्डाणपूल म्हणून या उड्डाणपुलाची ओळख आहे. अगदी चार ते पाच मिनिटात हा पूल पार करणं शक्य असताना जवळपास अर्धा तास हा पूल प्रवाशांना त्या दिवशी लागला आहे. त्यामुळे उड्डाणपूल बांधला असला तरी परिसरात वाहतूक सुधारणा करणं गरजेचं आहे. असच सध्या तरी दिसून येतंय.
सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी तशी नेहमीचीच आहे. अगदी पंधरा मिनिटाच्या अंतरासाठी प्रवाशांना पाऊण तास एक तास मोजावा लागतो. अशी इथल्या प्रवाशांची कायमच ओरड असते. याठिकाणी उड्डाणपूल बांधणं गरजेचं होतं. त्यामुळेच या उड्डाणपुलाचं काम सुरू असताना सिंहगड नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन केला होता. फन टाईम सिनेमाच्या समोर हा नवीन उड्डाणपूल उतरतोय. आणि त्याच ठिकाणी पुलावरनं येणारी वाहने पुलाच्या खालून येणारी वाहने आणि वडगाव या गावातनं येणारी वाहने एकाच ठिकाणी एकत्रित येतायेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र नवीन उड्डाणपूल सुरू झाल्यानंतरही जर परिस्थिती जैसे थेच असेल तर आता या परिस्थितीवर वाहतूक पोलीस काय नेमका मार्ग काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.