Chinchwad By-Election | शहरात व्हीआयपींचा प्रचारासाठी दौरा अन् पोलिसांचा रात्रंदिवस पहारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 15:14 IST2023-02-21T15:13:07+5:302023-02-21T15:14:17+5:30
शहरात मध्यरात्रीनंतर शुकशुकाट....

Chinchwad By-Election | शहरात व्हीआयपींचा प्रचारासाठी दौरा अन् पोलिसांचा रात्रंदिवस पहारा
पिंपरी : अपुऱ्या मनुष्यबळावर पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालयाचा गाडा हाकताना कसरत होत आहे. तरीही त्यांना २४ तास ऑन ड्युटी राहून कायदा सुव्यवस्था राखावी लागत आहे. त्यात सातत्याच्या बंदोबस्तामुळे पोलिसांची दमछाक होत आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीमुळे व्हीआयपींचा रात्रीही दौरा होत आहे. त्यामुळे पोलिसांना रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागत आहे.
राज्यात पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत देखील २१६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ३० जानेवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत पुणे येथे मैदानी चाचणी घेण्यात आली. या मैदानी चाचणी सुरळीत पार पाडण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिसांना पुण्यातील मैदानावर उपस्थित राहावे लागत होते. त्यामुळे नियमित कामकाज, तपास आदींसाठी पोलिस ठाण्यांच्या स्थानिक पोलिसांवर ताण आला. तसेच वाहतूक पोलिसांनाही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कसरत करावी लागली. दरम्यान, विधानसभेच्या चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. या पोटनिवडणुकीसाठी पोलिसांना चेकपोस्ट उभारून नाकाबंदी करावी लागत आहे. तसेच विविध राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या रॅली, सभा यासाठी देखील मोठा बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा लागत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. उपलब्ध मनुष्यबळातच नियमित कामकाजासह बंदोबस्त करावा लागत आहे.
व्हीआयपी रात्रीही डेरेदाखल
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडे पुरेशा संख्येने वाहने नाहीत. तसेच इतर साधनसामुग्रीही तोकडी आहे. अशातच रात्रंदिवस बंदोबस्त करावा लागत आहे. पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांचे काही व्हीआयपी पदाधिकारी रात्री शहरात डेरेदाखल होत आहेत. त्यासाठी पोलिसांना रात्रीही बंदोबस्त करावा लागत आहे.
शहरात मध्यरात्रीनंतर शुकशुकाट
शहरातील एमआयडीसी तसेच इतर भागांत मध्यरात्रीनंतर शुकशुकाट असतो. काही सफाई कर्मचारी, रिकामटेकडे, रस्त्याच्या कडेला किंवा पदपथावर झोपलेले भिकारी ठिकठिकाणी दिसून येतात. मात्र, इतर मुख्य चौकांमध्ये काही वाहने अधूनमधून ये-जा करतात. अंतर्गत भागातील चौकांमध्ये शुकशुकाट दिसून येतो. मात्र, रात्री उशिरापर्यंत काही राजकीय पदाधिकारी शहरात असतात. त्यांच्यासाठी पोलिसांना बंदोबस्त करावा लागतो.
पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम
दिवसा तसेच रात्रीही बंदोबस्त करावा लागत असल्याने शहर पोलिस दलातील अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. जेवण, पाणी, झोप वेळेवर व पुरेशी नसल्याने अनेक व्याधींचा त्रास होत आहे. नियमित व्यायामाला मुकावे लागत आहे.