बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (दि. २३) शांततेत मतदान पार पडले. १९९१ नंतरची ही दुसरी पोटनिवडणूक ठरली असून, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या या निवडणुकीत मतदारांमध्ये भावनिक वातावरण पाहायला मिळाले. सुनेत्रा पवार यांच्याकडे ‘बारामतीचा आश्वासक चेहरा’ म्हणून पाहिले जात असून, आजच्या मतदानातून मतदारांनी त्याबाबत आपली भूमिका व्यक्त केली.
तालुक्यातील ग्रामीण भागात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. सोनगाव, झारगडवाडी, डोर्लेवाडी, गुणवडी आदी गावांमध्ये मतदान केंद्रांवर सकाळीच रांगा लागल्या होत्या. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला. अनेक ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट दिसून आली. मात्र, प्रखर उन्हाळा आणि एकतर्फी लढतीमुळे मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे चित्र होते.
सांगवी परिसरातही मतदान शांततेत पार पडले. एकूण ६,०४४ मतदारांपैकी ३,७१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून दुपारपर्यंत उन्हाचा प्रभाव जाणवत असल्याने मतदान मंदावले होते, तर सायंकाळी पुन्हा मतदारांनी केंद्रांवर गर्दी केली. गेल्या चार दशकांत प्रथमच अजित पवार यांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक पार पडली. निवडणुकीची सूत्रे पार्थ पवार आणि जय पवार यांनी हाती घेतली होती. या निवडणुकीत राज्यातील प्रमुख नेत्यांनीही लक्ष घातल्याचे दिसून आले. विविध पक्षांचे मंत्री, आमदार आणि पदाधिकारी बारामतीत तळ ठोकून होते. आता ४ मे रोजी मतमोजणी होणार असून, ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘अजितदादां’च्या आठवणीने काटेवाडीकर भावुक
दिवंगत अजित पवार यांच्या आठवणीने काटेवाडीतील ग्रामस्थ भावुक झाले. मतदानाच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम मतदान करण्याची त्यांची परंपरा असल्याची आठवण ग्रामस्थांनी सांगितली. “आज दादांशिवाय मतदान करतोय, ही भावना मनाला पटत नाही,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
अपुऱ्या वाटचालीला पुढे नेण्याचा निर्धार : सुनेत्रा पवार
“आजचे मतदान हे अजितदादांच्या स्मृतींना दिलेली भावपूर्ण मानवंदना आहे. बारामतीकरांचा पाठिंबा म्हणजे त्यांच्या कार्यावरचा विश्वास आणि त्यांच्या अपुऱ्या वाटचालीला पुढे नेण्याचा निर्धार आहे,” असे मत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
....अन् सुनेत्रा पवारांचे डोळे पाणावले
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर काटेवाडीत पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक झाल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी पवार म्हणाल्या, मतदार आज मतदानासाठी कर्तव्य म्हणून बाहेर पडत आहेत. दादांनी त्यांच्यासाठी केलेल्या योगदानाची परतफेड आणि श्रद्धांजली म्हणून ते मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. खरं सांगायचं तर ही पोटनिवडणूक भावनिक वातावरणात होत असल्याने लोकांनीच हातात घेतली आहे. कर्तव्य म्हणून ते या निवडणुकीकडे पाहत आहेत. यावेळी पत्रकारांनी दादांच्या पश्चात ही पहिली निवडणूक आहे. साहेब पण आजारी असल्यामुळे येऊ शकले नाहीत. त्यामुळेही बारामतीकरांसाठी भावनिक निवडणूक आहे का?, असा प्रश्न विचारला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांचे डोळे पाणावले, सगळ्याच बाजूने निवडणूक भावनिक असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.
Web Summary : Baramati by-election sees emotional voting after Ajit Pawar's demise. Sunetra Pawar is seen as a promising face. Voters express their support amid a lower turnout due to heat and an expected result. Katewadi villagers remember Ajit Dada fondly.
Web Summary : अजित पवार के निधन के बाद बारामती उपचुनाव में भावनात्मक मतदान हुआ। सुनेत्रा पवार को एक आशाजनक चेहरे के रूप में देखा जा रहा है। गर्मी और अपेक्षित परिणाम के कारण कम मतदान के बीच मतदाताओं ने अपना समर्थन व्यक्त किया। काटेवाड़ी के ग्रामीणों ने अजित दादा को याद किया।